मुंबईत जमावबंदी अर्थात कलम १४४ लागू केल्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा  जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातलं ट्विट केलं आहे. कोणतेही नवे निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. कुणीही घाबरण्याचं कारण नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
“मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. मात्र कुणीही घाबरुन जाण्याची गरज नाही. कलम १४४ सीरआपीसी अंतर्गत जारी केलेल्या आदेशात फक्त ३१ ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या मागील आदेशाचा विस्तार आहे. मुंबई पोलिसांनी कोणतेही नवे निर्बंध लादलेले नाहीत.” असं आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय आहेत संचारबंदीतले ठळक मुद्दे?

  • राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे
  • कलम १४४ हे मुंबई पोलिसांच्या नित्य क्रमाचा भाग आहे. नवा लॉकडाउन लागू करण्यात आला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे
  • मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त शहाजी उमप यांनी हा आदेश लागू केला आहे.
  • जमावबंदीच्या आदेशनानुसार चारपेक्षा जास्त लोकांना एका जागी जमण्यास मज्जाव असतो.

दरम्यान मुंबईत बुधवारी २३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या पावणे दोन लाखांच्या पुढे गेली आहे. दररोज दोन हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली असून, सध्या ३१ हजारांहून अधिक रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा वेग सध्या १.२८ वर गेला आहे. आतापर्यंत १ लाख ३५ हजाराहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.