मराठा समाज क्रांती मोर्चाला राज्यभरातून मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद, सरकारकडून वारंवार आवाहन करूनही चर्चेला न मिळणारा प्रतिसाद आणि निवडणुकांच्या तोंडावर या मोर्चाचे विरोधकांकडून केले जाणारे राजकारण यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपाने या आंदोलनाची कोंडी फोडण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपविली आहे. येत्या १५ ऑक्टोबरला कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चाला पाटील स्वत: सामोरे जाऊन मोर्चेकऱ्यांशी थेट चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा, अ‍ॅट्रोसिटीच्या कायद्यास दुरूस्ती आणि मराठा समाजास आरक्षण या मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक जिल्ह्य़ात मराठा क्रांती मूक मोर्चा काढले जात आहेत. येत्या काही दिवसात कोल्हापूर, ठाण्यासह अन्य काही भागात हे मोर्च निघणार असून दिवाळीनंतर मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चास राज्यभरात मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सरकारची पुरती झोप उडाली आहे. त्यातच नजिकच्या काळात होत असलेल्या जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवून मराठा समाजाची ताकद पुन्हा आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सुरू केला आहे. सामनामधील व्यंगचित्रामुळे नाराज झालेला मराठा समाज उद्धव ठाकरे यांच्या माफीनंतरही शिवसेनेला माफ करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत मराठा क्रांती मोर्चाची मालिका अधिक काळ सुरू राहिल्यास त्याचा फटका सरकारला बसण्याची शक्यता वाढल्यामुळे आता शिवसेनेबरोबरच स्थानिक भाजपातूनही सरकारवर दबाव वाढू लागला आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ही कोंडी फोडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आदी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात झालेल्या सल्लामसलतीनंतर हा निर्णय घेण्यात आला. पाटील स्वत: मोर्चाला सामोरे जाणार आहेत.