सरकारी प्रकल्प जाहीर झालेल्या गावातील जमिनी कवडीमोल दराने विकत घेऊन सरकारला त्या वाढीव किंमतीला विकण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा आरोप पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी फेटाळला आहे. याप्रकरणी आपण मलिक यांच्याविरोधात न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती रावल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नवाब मलिक यांनी कोणतीही खातरजमा न करता खालच्या पातळीवर जाऊन आपल्यावर आरोप केले असून त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मलिक यांनी आपल्याकडे याबाबत पुरावे असून न्यायालयाला ते सादर करू असे म्हटले आहे.

धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर माध्यमांशी रावल यांनी संवाद साधला. मागील १० ते १५ वर्षांपासून रावल कुटुंबीय धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत असून पैसे कमावण्याचा सोपा मार्ग त्यांनी अवलंबल्याचे मलिक यांनी म्हटले होते. रावल कुटुंबाचे रॅकेटच यासाठी कार्यरत असून धुळे जिल्ह्यातील अनेक जमिनी या जयकुमार रावल किंवा त्यांच्या कंपनीच्या नावे आहेत. आजही त्या जागांचे ७/१२ उतारे व फेरफार दाखले पाहिल्यास त्याची नोंद आढळून येते, असा आरोप मलिक यांनी केला होता.

यावर रावल म्हणाले की, मलिक यांनी अत्यंत खालच्या पातळीवर माझ्यावर आरोप केले आहेत. विविध प्रकल्पांसाठी माझ्या आजोबांनी जमिनी दिल्या आहेत, असे सांगत दोंडईच्या न्यायालयात आपण मलिक यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, मलिक यांनी यासंबंधीचे आपल्याकडे पुरावे असून न्यायालयासमोर ते सर्व सादर करू, असे म्हटले. रावल यांनी न्यायालयात जाण्याचा घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांनी बनवेगिरी करून जमिनी कशा लाटल्या याची सर्व माहिती आणि पुरावे आपल्याकडे असून ती न्यायालयात साद करू, असेही ते म्हणाले.