रखडलेल्या बदल्या, त्यातून बोकाळलेला भ्रष्टाचार, कामे होत नसल्याबद्दल आमदार, कार्यकर्त्यांची नाराजी आणि एकूणच जनमानसात ढासळलेली सरकारची प्रतिमा यामुळे अस्वस्थ झालेल्या मंत्र्यांनी बुधवारी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच धारेवर धरले. आपण असेच आपापसात भांडत राहिलो तर लोकांच्या नाराजीला सामोरे कसे जाणार आणि आगामी निवडणुका कशा जिंकणार, असा सवाल करीत पक्षभेद विसरून संपूर्ण मंत्रिमंडळाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील शह काटशहाचे राजकारण थांबविण्याचा आग्रह धरला.
काँग्रेस आघाडी लागोपाठ तिसऱ्यांदा राज्यात सत्तेवर आहे. मात्र गेल्या साडेतीन वर्षांतील सरकारचा कारभार कामचलाऊ असल्यामुळे जनमानसाबरोबरच   कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड नाराजी आहे. यापूर्वी कर्जमाफी किंवा मोफत विजेच्या घोषणांनी सरकारला तारले असले तरी आजची परिस्थिती वेगळी आहे. एकीकडे सेना-भाजप-रिपाईची महायुती मनसेसह अन्य पक्षांना एकत्र करून निवडणुका लढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे दोन्ही काँग्रेस परस्परांना अडचणीत आणण्यासाठीच सरसावलेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीत काय होईल याची चिंता दोन्ही काँग्रेसच्या आमदारांना लागली असतानाच आता मंत्र्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचेच प्रतिबिंब उमटले.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगून आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सरकारची ढासळती प्रतिमा कशी सावरायची यावर तब्बल तासभर गंभीर चर्चा झाल्याचे समजते. आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे परस्परांच्या उखाळ्या-पाखाळ्या न काढता एकत्रितपणे काम करण्याची गरज असून त्याबाबत दोन्ही बाजूंकडून खबरदारी घेतली जावी, अशी भूमिका अनेक मंत्र्यांनी मांडली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सरकारच्या ‘डॅमेज कंट्रोल’च्या मुद्याला वाचा फोडली आणि नंतर सर्वच मंत्र्यानी आपली भूमिका मांडली. बदल्यांच्या कायद्यामुळे कारभार करणे मुश्किल झाले असून प्रशासनात मनमानी सुरू झाली आहे. सध्याच्या कायद्यामुळे कामकाज करणे मंत्र्यांनाही अवघड झाले असून त्यात सुधारणा करण्याची मागणी काही मंत्र्यांनी केली.

झाले तेवढे पुरे झाले!
आता आमदार आणि कार्यकर्तेही कामे होत नसल्याने थेट मंत्र्यावरच नाराज आहेत. पण निर्णयच होत नसल्याने आणि आम्हाला अधिकारच नसल्याने आम्ही तरी काय करणार, अशी कैफियत काही मंत्र्यांनी मांडली. झाले तेवढे पुरे झाले; आता परस्परांवर टीका न करता एकत्रित कामे करा, कोणताही निर्णय दोघांनी एकत्र बसून घ्या, आणि सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी चांगले निर्णय घ्या, असेही यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुनावण्यात आले.