कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी सुरु झाली आहे. मुंबईतील ईडीच्या कार्यालयात राज ठाकरे साडेअकराच्या समुरास पोहोचले असून बंद दरवाज्याआड त्यांची चौकशी सुरू आहे. सोमवारी राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यापासूनच या प्रकरणावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनाही आपले मत मांडले आहे. ‘राज ठाकरे यांची चौकशी झाली म्हणजे अटक होईलच असं नाही’ असे सूचक वक्तव्य केसरकर यांनी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बुधवारी या चौकशीमधून काहीच निष्पन्न होणार नसल्याचे म्हटले होते. त्याच वक्तव्याला समर्थन देणारे वक्तव्य आता केसरकर यांनी केले आहे.

राज यांच्या चौकशीबद्दल मत व्यक्त करताना केसरकर यांनी उद्धव यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे. “राज यांची चौकशी झाली म्हणजे अटक होईलच, असं कोणीही समजू नये. इतिहास पाहिल्यास चौकशी झाली त्या सर्वांनाच अटक झाली असं नाहीय. कालच उद्धव ठाकरेंनी या चौकशीमधून काहीच निष्पन्न होणार नाही असं सांगितलं होतं,” असं मत केसरकर यांनी राज ठाकरे चौकशीप्रकरणी बोलताना व्यक्त केले आहे.

दिल्लीत झालं ते महाराष्ट्रात होणार नाही

बुधवारी रात्री दिल्लीमध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली. याच प्रकरणाचा संदर्भ देत तसा कोणताही प्रकार राज यांच्याबाबतीत महाराष्ट्रात होणार नाही असं केसरकर यांनी सांगितलं. “काल दिल्लीत जो प्रकार घडला तो महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. ईडीच्या चौकशीला राज यांनी अगदी संयमाने घेतलं आहे. त्यांनी यंत्रणांना सर्व सहकार्य केलं आहे. कार्यकर्त्यांनाही शांत राहण्याचं आवाहन राज यांनी केलं आहे. मी देखील सर्वांना शांत राहण्याचं आवाहान करतो,” असं केसरकर म्हणाले आहेत.

पोलिसांची कारवाई कठोर नाही

मनसेच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र कोणावरही दडपशाही करण्याचा हेतू नसल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. “फार मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करायीच असती तर ती कालच केली असती. पोलिसांनाही संयमाने घ्यावं अशा सुचना करण्यात आल्या आहेत. खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आला असून दडपशाही करण्याचा कोणताही हेतू नाही. मुंबई हे खूप मोठं शहर आहे. येथील कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हीच शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडत खबरदारी म्हणून काही जणांना ताब्यात घेतलं आहे. यामागे इतर कोणताही हेतू नाही,” असं केसरकर म्हणाले. तसंच चौकशीमधून काही निष्पन्न झालं नाही तर लोक हे प्रकरण विसरुनही जातील असं केसरकर म्हणाले आहेत.