खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार आता एक-दोन आठवडय़ांत होण्याची शक्यता आहे. खडसे यांच्याकडील महसूल हे खाते कोणाकडे दिले जाणार याची उत्सुकता आहे. चंद्रकांत पाटील किंवा सुधीर मुनगंटीवार यांच्यापैकी एकाकडे हे महत्त्वाचे खाते सोपविले जाण्याची शक्यता आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा हे रविवारी पुण्यात असून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सूत्रांनी सांगितले.
खडसे यांच्याकडे आठ खाती होती. त्यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर अनेक खात्यांचा भार असल्याने कामाचा ताण आहे. मंत्रिमंडळ विस्तारात या मंत्र्यांकडील तुलनेने कमी महत्त्वाच्या खात्यांचा भार अन्य मंत्र्यांकडे सोपविला जाणार आहे. आधीच कामाचा ताण असताना खडसे यांच्याकडील खात्यांचा कार्यभारही ज्येष्ठ मंत्र्यांकडे सोपविला जाणार आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले होतेच, पण आता तो तातडीने केला जाईल, असे संकेत मिळत आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या विभागांतील आणि विदर्भातील एका सदस्याचा मंत्रिमंडळात समावेश होईल. घटकपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले असून विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेवर निवडूनही आणण्यात आले आहे.