माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा आदेश

भारतीय भाषांच्या प्रसारासाठी मालिका, चित्रपट यांची शीर्षके, कलाकारांची नावे आणि अन्य तपशील हिंदी तसेच प्रादेशिक भाषेतून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून सगळ्या उपग्रह वाहिन्यांना तसे आदेश देण्यात आले असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

हिंदी किंवा अन्य प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होणाऱ्या मालिकांची शीर्षके, कलाकारांची नावे इत्यादी तपशील फक्त इंग्रजी भाषेतूनच दाखवला जात असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे केवळ प्रादेशिक भाषाच येत असलेल्या अनेकांना मालिकेसंबंधीची माहिती लक्षात येत नाही.

देशभरातील लोकांना त्यांच्या भाषेत ही माहिती मिळावी आणि प्रादेशिक भाषांचा सर्वदूर प्रसार व्हावा यासाठी सगळ्या उपग्रह वाहिन्यांना भारतीय भाषांमध्ये शीर्षके दाखवली जावीत, असा आदेश देण्यात येत असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. या मालिका ज्या भाषेत प्रसारित होतात त्या भाषेत त्यांची नावे दाखवली जावीत. निर्मात्यांना इंग्रजी भाषेत नावे दाखवायचे असतील तर त्याला काही हरकत नाही, मात्र प्रादेशिक भाषेतही ती दाखवली गेली पाहिजेत, असे सांगत हाच नियम चित्रपटांनाही लागू करण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.