‘महाराष्ट्र रेल इन्फ्रोस्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉपरेरेशन लिमिटेड’च्या (एमआरआयडीसीएल) पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून यामुळे दोन शहरांतील अंतर पावणेदोन तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. येत्या पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीनंतर प्रकल्प सहकार्यासाठी महाराष्ट्र सरकारकडूनही तत्त्वत: मंजुरी घेतली जाणार आहे. प्रकल्पानुसार २३५.१५ किलोमीटरच्या अंतरावर सेमी हायस्पीड रेल्वेसाठी दोन मार्ग बनवण्यात येतील. ब्रॉड गेज बनवण्यात येणाऱ्या या मार्गावरून प्रति तास २०० किलोमीटर वेगाने गाडी धावेल. याचा वेग जास्तीत जास्त प्रति तास २५० किलोमीटपर्यंत जाऊ शकतो. पुणे, अहमदनगर, नाशिक अशा तीन जिल्ह्य़ांतून ही रेल्वे धावेल. प्रकल्पामुळे उद्योग व पर्यटनालाही चालना मिळणार आहे. प्रकल्पाची किंमत १६ हजार ३९ कोटी रुपये आहे. या मार्गाचा मालवाहतुकीसाठीही वापर होईल. त्यासाठी मार्गावर १३ क्रॉसिंग स्थानके बनवण्यात येतील.

मार्ग असा..

*   हायस्पीड रेल्वे पुणे रेल्वे स्थानकातून सुटताच ती हडपसपर्यंत उन्नत मार्गावरून धावेल. त्यानंतर हडपसर ते नाशिक रेल्वे स्थानकापर्यंत जमिनीवरून धावेल.

*  चाकण, मंचर, नारायण गाव, अलिफाटा, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक येथे थांबा

*  नव्या स्थानकात अनेक सोयीसुविधा उपलब्ध

*  सुरुवातीला हाय स्पीड रेल्वे सहा डब्यांची असेल. नंतर ही संख्या १२ आणि १६ डब्यांपर्यंत वाढेल.

*  मार्गावर ६.६४ किलोमीटरचा एक मोठा बोगदा आणि एकूण २१ किलोमीटर लांबीचे एकूण १८ छोटे बोगदे असतील