धावण्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. याच उद्देशाने रायन ग्रुप ऑफ इनस्टीटयुट तर्फे १६ वर्षांखालील शालेय विद्यार्थ्यांसाठी मिनिथॉनचे आयोजन करण्यात आले होते. बोरीवली येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १५८ व्या या मिनिथोनमध्ये ४१ हून अधिक शाळांतील ११,७०६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये १२ ते १६ वर्षे वयोगटातील मुले सहभागी झाली होती. वय १२, १४ आणि१६ खालील ह्या वयोगटात खोराजीया शुभान (सेंट झेवियर स्कूल गोरेगाव), एलामुरुगु (सेंट लाव्रेंस, वाशी) आणि मोडी निहार (सेंट लाव्रेंस, बोरीवली) ह्या मुलांनी बाजी मारली. तर श्वेता बाल्कन (सेंट झेवियर स्कूल, अंधेरी) , ऋतुजा डबली (सेंट झेवियर स्कूल गोरेगाव) आणि हर्षदा मोकल (सेंट जोसेफ, पनवेल) या मुलींनी यश पटकावले. वय १२, १४ आणि १६ या गटांसाठी अनुक्रमे २ किमी, ३ किमी, ४ किमी अंतराची स्पर्धा ठेवण्यात आली होती.

१९९८ मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेचा प्रतिसाद दरवर्षी वाढत असून देशभरात वर्षाला एक लाखाहून अधिक विद्यार्थी या मिनिथोनमध्ये सहभागी होत असल्याची माहिती रायन ग्रुप ऑफ इन्स्टीटयुटचे व्यवस्थापकीय संचालक रायन पिंटो यांनी सांगितले. नागपूर आणि अहमदाबादनंतर मुंबईमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात जबलपूर, जयपूर, चंडीगड, फरीदाबाद, नवी मुंबई बंगळुरु, सुरत, रायपुर आणि नाशिक मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल असेही ते म्हणाले. येत्या शैक्षणिक वर्षात याबाबतचे नियोजन होईल अशी माहिती त्यांनी दिली.