News Flash

दहावीत फर्स्ट क्लास, अकरावीत नापास अन् लेडीज बारचा पाश!

वडाळा परिसरात राहणारा १७ वर्षांचा समीर (नाव बदलले आहे) याला दहावीला ७० टक्के मिळाले होते.

घरातून रोकड घेऊन पळून गेलेला अल्पवयीन बारमधून ताब्यात

सध्या वाजतगाजत असलेल्या लेडीज/ डान्स बारच्या मोहात उद्ध्वस्त होणारी तरुण पिढी आणि चुकीच्या करिअरच्या वाटांवर गेल्यामुळे हताश झालेली तरुण पिढी या दोन्हींचे परिणाम दर्शवणारी धक्कादायक घटना अलीकडेच वडाळा येथून उघडकीस आली. दहावीत ७० टक्के मिळालेल्या एका युवकाने अकरावीत नापास झाल्यानंतर पालकांच्या भीतीने घरातील तीन लाखांचा ऐवज घेऊन पलायन केले. तब्बल १५ दिवस पालकांच्या जिवाला घोर लावल्यानंतर हा अल्पवयीन अखेर दक्षिण मुंबईतील एका लेडीज बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना सापडला.

वडाळा परिसरात राहणारा १७ वर्षांचा समीर (नाव बदलले आहे) याला दहावीला ७० टक्के मिळाले होते. मात्र, कुटुंबीयांच्या दबावामुळे आवड नसूनही विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. परिणाम व्हायचा तोच झाला, समीर ११वीत नापास झाला. इतका हुशार मुलगा नापास झाल्याचे पाहून त्याच्या कुटुंबीयांकडून त्याला जोरदार ओरडा बसला. अखेर वैतागलेल्या समीरने २९ एप्रिलला स्वत:ची सर्व कागदपत्रे, घरातील तीन लाख रुपये रोख आणि आईचे दागिने घेऊन घरातून पळ काढला. मुलगा कुणाकडे तरी गेला असेल या विचारात असलेल्या कुटुंबीयांना दोन दिवस उलटल्यानंतर मात्र काही तरी विपरीत घडल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने वडाळा पोलीस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी समीरचा तपास सुरू केल्यानंतर मालमत्ता शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.  समीर आपला मोबाइल वापरत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे, पोलिसांनी त्याच्या मित्रांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्या वेळी, समीरने आपल्या एका मित्राशी संपर्क साधल्याचे पोलिसांना कळाले. खबरींच्या माध्यमातून पोलिसांना माहिती मिळाली, की १७ वर्षांचा एक मुलगा दिवसाआड बारमधून फिरत असून सध्या एका लेडीज बारमध्ये बसला आहे. मालमत्ता कक्षाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे, हवालदार सोनावणे, जगताप, पाटील यांच्या पथकाने तातडीने धाव घेऊन समीरला बारमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारपूस केली असता, आपण सर्व पैसे दारू आणि चैनीत उडविल्याचे सांगितले. गेले १५ दिवस दक्षिण मुंबईतील लॉजमध्ये दोन-दोन दिवस राहत असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. मुलाची भेट कुटुंबीयांशी घडविल्यानंतर, पालकांना मुलाशी प्रेमाने वागण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2016 2:06 am

Web Title: minor boy arrested from bar for talking cash and flee from house
Next Stories
1 औरंगाबादचा शौनक कुलकर्णी आणि पुण्याचा ऋषभ बलदोता ‘ब्लॉगबेंचर्स’चे विजेते
2 स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांच्या शुल्कवाढीचा घाट?
3 इमारत उभारणीसाठी परवानग्या दिल्यानंतर भूखंड घोटाळा कसा?
Just Now!
X