फेसबुकवरील तरुणाशी मैत्री करणे गोव्यातील एका अल्पवयीन तरुणीला चांगलेच महागात पडले. आरोपी मुलाने बनावट खाते उघडून या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला मुंबईत फसवून आणले. नशीब बलवत्तर म्हणून ती त्याच्या तावडीतून सुटली. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.
  गोव्यात राहणाऱ्या १७ वर्षीय मरीना (नाव बदललेले)हिची सुमारे सहा महिन्यांपूर्वी मुंबईतील एका तरुणाशी फेसबुकवर ओळख झाली. दोघांची फेसबुकवरून मैत्री वाढत गेली आणि त्या मुलाने मरिनाला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले. पुढे त्याने तिला मुंबईत येण्याची गळ घातली. त्याच्या भुलथापांना भुलून ती मुंबईत आली. आरोपी मुलाने मग या मुलीला कुर्ला येथे बोलावले. त्याच्या सांगण्याप्रमाणे ती कुर्ला स्थानकात उतरली. तेथून आरोपीने या मुलीला एका अज्ञात ठिकाणी नेले आणि दोन दिवसानंतर त्याने तिला सोडून दिले. या अनपेक्षित प्रकाराने मरिना गडबडली. मुंबईत ती प्रथमच आली होती. त्यामुळे विमनस्क अवस्थेत भटकत असताना ती कुर्ला रेल्वे पोलिसांना सापडली. दरम्यान, गोव्यात तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपी मुलाचा मोबाईल क्रमांक बंद आहे तसेच त्याचा पत्ताही बनावट निघाल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली.