दक्षिण मुंबईतून जलदगतीने चेंबूरला पोहोचविणाऱ्या पूर्व मुक्त मार्गाच्या पोकळीमध्ये गुरुवारी दुपारी एका सहा वर्षांच्या मुलाचा सांगाडा सापडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले असून या प्रकरणी ते अधिक तपास करीत आहेत.
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी दक्षिण मुंबईतून थेट चेंबूपर्यंत पूर्व मुक्त मार्ग उभारण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र भरधाव वेगात जाणाऱ्या काही वाहनांचे अपघात झाल्यामुळे पूर्व मुक्त मार्गाबाबत चिंताही व्यक्त होऊ लागली. आता पूर्व मुक्त मार्गाच्या खालील बाजूस असलेल्या पोकळीमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचा सांगाडा सापडला आहे. केबल टाकण्याचे काम सुरू करणाऱ्या कामगारांना हा सापळा दिसला.पोलिसांनी या परिसरातून बेपत्ता असलेल्यांची यादी तयार केली आणि त्याच्या आधारे सापडलेल्या सापळा हा फुरकन रहीम खान याचा असल्याचे निष्पन्न झाले.
वडाळा येथील दिनबंधू नगरमध्ये राहणारा फुरकन हा १३ ऑक्टोबर २०१५ पासून बेपत्ता होता. वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी त्याची ओळख पटवली असून पुढील तपास करण्यात येत आहे.