वाढत्या दबावामुळे आरोपीला पुन्हा अटक

छेडछाडीला विरोध करणाऱ्या अल्पवयीन तरुणीला भररस्त्यात मारहाण करणाऱ्या इम्रान शेख या आरोपीला नेहरूनगर पोलिसांनी वाढत्या दबावामुळे पुन्हा अटक केली. मारहाणीची घटना १७ ऑक्टोबर रोजी कुल्र्यातील श्रमजीवी नगरात घडली. ही मारहाण इतकी अमानुष होती की तरुणीच्या नाकाचे हाड मोडले आहे.

श्रमजीवी नगरातील एकाच इमारतीत तक्रारदार तरुणी आणि आरोपी इम्रान वास्तव्यास असून ते एकमेकांना ओळखतात. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास तरुणी मैत्रिणीसोबत खासगी शिकवणीला जात असताना इम्रानने छेड काढण्याच्या उद्देशाने मोठय़ा आवाजात शेरेबाजी सुरू केली. तेव्हा संतापलेल्या तरुणीने इम्रानला दोन खडे बोल सुनावले. हे सहन न झाल्याने इम्रान तरुणीच्या अंगावर धावून जात तिच्या केसाला पकडून चेहऱ्यावर जोरात फटके मारले. या वेळी इम्रानच्या हातातील कडे तरुणीच्या नाकावर, चेहऱ्यावर लागले आणि ती गंभीररीत्या जखमी झाली. नातेवाईकांनी तरुणीला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्याच दिवशी रात्री नेहरूनगर पोलिसांनी आरोपी इम्रानला अटक केली. मात्र गंभीर गुन्हय़ांची कलमे नोंदवण्यात न आल्याने त्याला न्यायालयाने जामिनावर मुक्त केले.

त्याच वेळी मारहाणीचे सीसीटीव्ही चित्रण सर्वदूर पसरले. शिवसेनेचे स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी तरुणीचा सविस्तर जबाब नोंदवून योग्य त्या कलमान्वये आरोपी इम्रानविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी तरुणीचा जबाब पुन्हा नोंदवला. यावेळी तिने इम्रान वरचेवर छेड काढत असे. घटनेच्या दिवशीही त्याने छेड काढली होती, प्रतिकार किंवा विरोध केल्याने त्याने हल्ला केल्याचे सांगितले. त्याआधारे या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून शनिवारी इम्रानला पुन्हा अटक करण्यात आली, अशी माहिती नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद कोपर्डे यांनी दिली.