तळोजा येथील एक अल्पवयीन मुलगी सोमवार रात्रीपासून बेपत्ता झाली आहे. घरातून बेपत्ता होणापूर्वी या मुलीने एक सुसाइड नोट लिहिली होती. या सुसाइड नोटमध्ये तिने पुण्याचे डीआयजी निशिकांत मोरे यांच्यामुळे आपण आत्महत्या करतो आहोत असे या मुलीने या सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. २६ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी निशिकांत मोरे यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे येथील ट्रान्सपोर्ट विभागात डीआयजी असलेल्या निशिकांत मोरे यांच्यावर एका अल्पवयीन मुलीने गंभीर आरोप केले आहेत. जून महिन्यात या मुलीचा वाढदिवस होता. निशिकांत मोरे आणि मुलीचे कुटुंबीय एकमेकांचे परिचयाचे असल्याने मोरे त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करायला गेले होते. केक कापल्यानंतर मोरे यांनी या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता.

पीडित मुलीचा विनयभंग केल्याचा मोबाइल व्हिडीओही तळोजा पोलीस ठाण्यात देत मुलीच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सहा महिने टाळाटाळ केली. अखेर डिसेंबर महिन्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मी निराश झाले आहे, या प्रकरणामुळे माझ्या परिवाराची बदनामी झाली. त्यामुळे मी आत्महत्या करते आहे. माझ्या आत्महत्येला डीआयजी निशिकांत मोरे जबाबदार आहेत असा सगळा उल्लेख या मुलीने तिच्या सुसाइड नोटमध्ये केला आहे. मात्र ही मुलगी सोमवार रात्रीपासून बेपत्ता आहे.