वांद्रे येथे एका अल्पवयीन तरुणीवर गेल्या दोन महिन्यांत दोघांकडून बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातला एक आरोपी अख्तर कुरेशी (४९) हा स्थानिक नेता आहे, तर दुसरा आरोपी तरुणीचा प्रियकर आहे. कुरेशी याचे मुलीच्या वडिलांशी वैमनस्य होते. त्याचा बदला घेण्यासाठीच त्याने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. निर्मलनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. तर या प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्या अल्पवयीन मुलीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणातली पीडित मुलगी निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. मंगळवारी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी तिच्या पालकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार २ जुलै रोजी तिला तिच्या एका १५ वर्षीय शाळकरी मैत्रिणीने भेटायला बोलावले होते. तेथे स्थानिक नेता मुन्शी अख्तर कुरेशी (४९) याने तिला शीतपेय पिण्यास दिले. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. अख्तरने तिच्यावर बलात्कार केला. तिचे फोटो काढले आहेत, असे सांगून गप्प राहण्यास सांगितले आणि ३ जुलै रोजी पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कुरेशीने पुन्हा ५ जुलै रोजी तिला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. ७ जुलैला विजयकुमार राजभर ऊर्फ मोहम्मद अली खान या तिच्या प्रियकरानेही आपल्या कारखान्यात तिला बोलावले. त्या वेळी कुरेशी आणि विजयकुमार या दोघांनी तिच्यावर संगनमताने बलात्कार केला.
निर्मलनगर पोलिसांनी याप्रकरणी मुन्शी अख्तर कुरेशी आणि विजयकुमार ऊर्फ मोहम्मद अली या दोघांना अटक केली. तर तिला मुन्शी कुरेशीकडे घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन मुलीलाही अटक करून तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. या तरुणीचे विजयकुमारशी प्रेमसंबंध होते. यापूर्वीही ती पाच वेळा त्याच्यासाठी घर सोडून गेली होती, असे निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बोरसे यांनी सांगितले. पीडित मुलीच्या वडिलांचा कुरेशी याच्याशी घरावरून वाद होता. त्यामुळे माझा बदला घेण्यासाठी माझ्या मुलीवर त्याने बलात्कार केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला.

मुंब्य्रात गतिमंद मुलीवर बलात्कार
प्रतिनिधी, ठाणे</strong>
गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून मुंब्रा येथील अमृतनगरातील वैष्णवी अपार्टमेंटमधील महम्मद शेख (२४) यांस बुधवारी पोलिसांनी अटक केली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ५ सप्टेंबर रोजी महम्मदने त्याच परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय गतिमंद मुलीस मुंब्रा बायपास येथे नेऊन तेथील झुडपांमध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्या दिवशी रात्री एक वाजता ही मुलगी घरी आली. मंगळवारी तिने ही घटना आईला सांगितली. त्यानंतर आईने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी महम्मदला अटक केली आहे.