जगातील लहान मुलांच्या स्थितीबाबत ‘युनिसेफ’चा अहवाल

जगातील इंटरनेटच्या वापरकर्त्यांमधे एक तृतीयांश अल्पवयीन मुले असून भारतातील मुलांमध्ये समाजमाध्यमांचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे. इंटरनेट वापरणाऱ्या मुलांमधील ९० टक्के मुले ही समाजमाध्यमांच्या माध्यमातून नाती जोपासण्यासाठी नवे मित्र शोधण्यात उत्सुक असतात, असे निरीक्षण समोर आले आहे. त्याचप्रमाणे गृहपाठ पूर्ण करण्यासाठीही मुलांकडून इंटरनेटचा वापर वाढत असल्याचे अभ्यासाअंती पुढे आले आहे.

‘युनिसेफ’ ही संस्था दरवर्षी जगातील मुलांच्या स्थितीचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष मांडत असते. ‘जगातील लहान मुलांची सद्य:स्थिती २०१७’ या अहवालात मुलांकडून करण्यात येणारा इंटरनेटचा वापर याबाबतचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. या अहवालानुसार जगातील इंटरनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येक तीन व्यक्तींमधील एक अल्पवयीन आहे. भारतात अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबाचा १६ टक्के खर्च हा स्मार्टफोनवर होतो. मात्र भारतात इंटरनेटचा वापर करणाऱ्या मुलींचे प्रमाण तुलनेने कमी असून २९ टक्के मुली आहेत. ग्रामिण भागांतील मुलींवर मोबाइल आणि इंटरनेटच्या वापरावर बंधने घातली जातात, असे निरीक्षण या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातील इंटरनेट वापरणाऱ्या मुलांचा कल हा समाजमाध्यमांच्या वापराकडे अधिक असून त्याचे प्रमाण ९० टक्के आहे. समाजमाध्यमांवर नवे मित्र शोधण्यासाठी मुले इंटरनेटचा वापर करतात. ‘समाजमाध्यमांच्या वापरातून नाते चांगले जोपासता येऊ शकते,’ असे उत्तर देणाऱ्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान समोर आले. पालकांच्या देखरेखीशिवाय समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या मुलांचे प्रमाण उच्च-उत्पन्न गटातील कुटुंबांमध्ये अधिक आहे. त्यातून मुलांच्या सुरक्षेबाबतचे प्रश्नही अधिक वाढत आहेत, असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. गृहपाठ करण्यासाठी इंटरनेटचा वापर मुलांकडून मोठय़ा प्रमाणात करण्यात येतो, असेही नोंदविण्यात आले आहे.

राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

या अहवालाच्या डिजिटल आवृत्तीचे अनावरण बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. ‘तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, गुणवत्ता यांच्या विकासाच्या चांगल्या संधीही यामुळे विकसित झाल्या आहेत. त्यामुळे मुलांना तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. मात्र, दुसऱ्या बाजूला सायबर गुन्हे, लहान मुलांचे शोषण, हिंसाचार यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेसाठी संस्थात्मक रचना निर्माण करणेही गरजेचे आहे. मुलांसाठी योग्य, सकस असा मजकूर उपलब्ध व्हावा,’ अशी अपेक्षा विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.  ‘इंटरनेटचा वापर योग्य होण्यासाठी मुलांमधील डिजिटल साक्षरता वाढणे गरजेचे आहे,’ असे मत युनिसेफच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रमुख राजश्री चंद्रशेखर यांनी व्यक्त केले.