मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये शिवसेना व भाजपा नगरसेवकांमध्ये वाद शिगेला गेल्याने राडा झाला. मंगळवारी महापालिकेत स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाच्या विषयाचा समावेश न केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याने वाद शिगेला गेला. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या स्थानिक आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत महापौर कार्यालय, स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केली.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी बोलवण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालन आणि प्रमोद महाजन सभागृहाच्या विषयावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. आज मंगळवारी (१७ सप्टेंबर) स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार होती. मात्र, आजही कला दालनाचा विषय नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी बैठकीत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. स्थानिक आमदार नरेंद्र मेहता हे यात आडकाठी आणत असल्याचा आरोप शिवसेने केला. त्यानंतर मेहता यांना शिवीगाळ करत शिवसेना नगरसेवकांनी स्थायी समिती सभागृह, महापौर कार्यालयात तोडफोड केली. जोपर्यंत हा निर्णय होत नाही, तोपर्यंत सभा चालू देणारं नाही, असा पवित्रा शिवसेनेनं घेतला आहे.

पाहा व्हिडीओ-

कला दालन आणि वादाचं कारण-

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालन आणि भाजपाचे नेते स्वर्गीय प्रमोद महाजन सभागृह उभाण्याचा प्रस्ताव मीरा-भाईंदर महापालिकेने मंजूर केला होता. शिवसेनेच्या जिव्हाळ्याचा निर्णय असल्याने शिवसेनेच्या स्थानिक आमदारांसह महापालिका पदाधिकाऱ्यांचे याकडे जास्त लक्ष आहे. दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याला आमदार नरेंद्र मेहता यांना जबाबदार धरले आहे. “बाळासाहेब ठाकरे कला दालन आणि प्रमोद महाजन सभागृहाच्या निधीची तरतूद आहे. शिवसेनेच्या चार नगरसेवक, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह दोन आमदारांनीही यासाठी निधी दिला आहे. आचारसंहिता लागेल म्हणून महापालिका आयुक्तांनीही हा गोषवारा सचिवांकडे दिला आहे. यासाठीचे टेंडरही मंजूर झाले आहे. फक्त बजेट नसल्याचे कारण दिले जात आहे. आज कला दालन आणि सभागृह हे दोन्ही विषय चर्चेत आले होते. त्यावेळी ते टाळण्याचा प्रयत्न भाजपाने केला. यामागे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता हे असून, तेच या विषयाला टाळण्याचा प्रयत्न करीत आहे,” असा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे.

पाहा व्हिडीओ-