मीरा रोडमध्ये मद्यपी तरुणांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. इमारतीतील एका घरात पार्टी सुरु असून तिथे संगीताच्या दणदणाटात धांगडधिंगा सुरु असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. या तक्रारीच्या चौकशीसाठी पोलीस घटनास्थळी गेले असता तरुणांनी पोलिसांनाच खोलीत डांबून त्यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेतले असून यात दोन महिलांचाही समावेश आहे.

मीरा रोडमधील पुनम गार्डन येथील समृद्धी सोसायटीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सोमवारी रात्री पार्टी सुरु होती. ३१ वर्षांच्या चिराग त्रिवेदीच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी सुरु होती. मात्र, रात्रभर घरात पार्टीच्या नावाखाली अक्षरश: धिंगाणा सुरु होता. हा प्रकार असह्य झाल्याने इमारतीतील रहिवाशांनी पहाटे पाच वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याबाबतची तक्रार केली.

तक्रार येताच मीरा रोड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल झांजे आणि प्रदीप गोरे हे दोघे घटनास्थळी रवाना झाले. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फ्लॅटमध्ये नेले. तिथे पार्टी करणाऱ्या तरुणांनी सुरक्षा रक्षकाला जायला सांगितले आणि दोन्ही पोलिसांना घरात खेचले. यानंतर त्या तरुणांनी दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली. “पोलिसांनी पार्टीत विघ्न आणल्याचा त्या तरुणांचे म्हणणे होते. तर नियंत्रण कक्षात तक्रार गेल्याने आम्ही फक्त नेमका काय प्रकार सुरु आहे याची चौकशी करण्यासाठी आलो आहोत, असे त्या कॉन्स्टेबलने तरुणांना सांगितले. मात्र, ते तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी दोन्ही कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली”, अशी माहिती पोलीस निरीक्षक वसंत लाबडे यांनी दिली.

यातील एका कॉन्स्टेबलने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली आणि तातडीने पोलीस निरीक्षकांना फोन केला. शेवटी मीरारोड पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी पोहोचली. त्या टीमवरही तरुणांनी हल्ला केला. यात कॉन्स्टेबल प्रमोद केंद्रे हे जखमी झाले. पोलिसांनी १२ तरुण आणि २ तरुणींना ताब्यात घेतले. घरात दारुच्या बॉटल आणि हुक्का पाईप सापडले असून त्या सर्वांनी फक्त मद्यपान केले होती की अमलीपदार्थाचे सेवनही केले होते, हे वैद्यकीय तपासणीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.