‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्कार सोहळ्यात मीरां बोरवणकर यांची भावना

मुंबई : मी राज्यात आले तेव्हा पोलीस खात्यामध्ये महिलांचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे मला फार एकाकी वाटायचे. त्यावेळी अगदी वरिष्ठ पदापासून ते शिपायांपर्यंत सर्वच स्तरातील पोलिसांच्या पत्नींनी मला खंबीर पाठिंबा दिला. त्यामुळे ‘लोकसत्ता’कडून मिळालेला   जीवनगौरव पुरस्कार मी त्यांना समर्पित करते, असे प्रतिपादन निवृत्त पोलीस अधिकारी मीरां चड्ढा बोरवणकर यांनी केले.

जीवनगौरव पुरस्कार मिळाला म्हणजे कामातून निवृत्त झाले, असे समजले जाते. मी नोकरीतून निवृत्त झाले असले तरी माझे काम सुरूच असल्याचे बोरवणकर यांनी सांगितले. पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या पुरुषांच्या मागे त्यांच्या पत्नी ठामपणे उभ्या आहेत, म्हणून ते पूर्णपणे झोकून देऊन काम करू शकतात. मला मराठी येत नसूनही या महिलांनी मला आपलेसे केले. त्यांनी  मला थालीपीठ, पिठलं भाकरी यासारख्या पाककृती शिकवल्या, त्याचबरोबर वेळप्रसंगी माझ्या मुलांनाही सांभाळून घेतले. या महिलांच्या प्रोत्साहनामुळे मी खात्यामध्ये अधिक जोमाने काम करू शकले, अशा भावना बोरवणकर यांनी व्यक्त केल्या.

तळागाळात वावरून ठाशीव पद्धतीने काम करणाऱ्या दुर्गाच्या नजरेतून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यरत महिलांच्या कामाचा वेध मंगळवारी ‘लोकसत्ता दुर्गा’ पुरस्कारातून उलगडला.

एचआयव्ही-एड्सग्रस्त मुलांच्या आई झालेल्या मंगलताई शहा, वाळू माफियांना रोखणाऱ्या तडफदार तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि अनेक विक्रम करणाऱ्या जलतरणपटू ‘सागरकन्या’ रूपाली रेपाळे यांना पॉप्युलर प्रकाशनचे संस्थापक आणि लेखक रामदास भटकळ, नाटककार आणि चित्रपट कथालेखक प्रशांत दळवी, एनकेजीएसबी को.ऑप बँक लिमिटेडचे सुनील गायतोंडे, व्ही. एम. मुसळूणकर ज्वेलर्सचे सुहास मुसळूणकर आणि ‘लोकसत्ता’चे केदार वाळिंबे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

विविध सामाजिक संस्थांना दानशूर लोकांपर्यंत पोहोचवून कोटय़वधी रुपयांचे दान मिळवून देणाऱ्या वीणा गोखले, वंचित मुलांसाठी ‘ज्ञानदेवी’ ही संस्था काढून हजारो मुलांसाठी आधारवड बनलेल्या डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे आणि मेळघाट येथे राहून आदिवासींच्या डोळ्यांवर उपचार करणाऱ्या डॉ. कविता सातव यांना नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, कवी-अभिनेता किशोर कदम आणि ‘द इंडियन एक्स्प्रेस ग्रुप’च्या वैदेही ठकार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कवी, नाटककार प्रेमानंद गज्वी, अभिनेता सुमीत राघवन आणि ग्रॅव्हिटस फाऊंडेशनच्या उषा काकडे यांच्या हस्ते मतिमंद मुलांसाठी ‘घरकुल’ थाटणाऱ्या नंदिनी बर्वे, लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांना मानसिक वेदनेतून बाहेर काढण्यासाठी यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. मीनाक्षी नलबले भोसले, समाजातील कुप्रथा, बुवा-बाबांची भोंदूगिरी आणि जातपंचायतींच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या अ‍ॅड्. रंजना गवांदे यांना पुरस्कार देण्यात आला.

मिताली विंचूरकर, मेघा राऊत आणि कौशिकी जोगळेकर यांच्या सुरेल वादनाने सोहळ्यास आरंभ झाला. कवी सौमित्र यांनी आपल्या विशिष्ट शैलीमध्ये स्त्रीच्या भूमिकेचे विविध पदर उलगडले. नाशिकच्या दसक्कर भगिनींच्या कोणत्याही वाद्याविना सादर केलेल्या संगीताच्या बहारदार मैफलीने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी जीवनगौरव पुरस्कारामागील भूमिका मांडली. स्त्रीदाक्षिण्याच्या दृष्टिकोनातून स्त्रियांच्या कामाचा गौरव करण्याचा  नव्हे, तर काळाच्या वाळूवर ठसा उमटविलेल्या महिलांची स्वतंत्र ओळख समाजाला करून देणे हा पुरस्काराचा उद्देश आहे.  मीरां बोरवणकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची कामे केली हे मान्य आहे. परंतु, त्यापलीकडे खाकी वर्दीतला हा एक वेगळा चेहरा आहे आणि याचा सन्मान करण्यासाठी हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत असल्याचे कुबेर यांनी स्पष्ट केले.

‘लोकसत्ता’च्या फिचर एडिटर आरती कदम यांनी नवदुर्गाचा शोध घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमांमागील भूमिका स्पष्ट केली. या पुरस्काराला याहीवर्षी चारशेहून अधिक प्रवेशिका आल्या होत्या. दुर्गानी त्यांच्या कामातून लावलेली ज्योत तुम्ही समाजात घेऊन जाऊन प्रकाशमय कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाचे संहिता लेखन चिन्मय पाटणकर यांनी केले होते. तर सूत्रसंचालन मधुरा वेलणकर यांनी केले. पुरस्काराच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या ध्वनिचित्रफितीचा आवाज मकरंद पाटील यांचा होता.

कार्यक्रमाचे प्रायोजक

प्रस्तुतकर्ते : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत ‘लोकसत्ता दुर्गा’

सहप्रायोजक : एन के जी एस बी को-ऑप. बँक लि. आणि व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स

पॉवर्ड बाय : व्ही. एम. मुसळूणकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि., राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिाइजर्स लि. पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक, इंडियन ऑइल, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ)

टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा