डोंबिवलीतील बलात्कार तसेच छेडछाडीच्या घटना ताज्या असतानाच ठाण्यातील पातलीपाडा तसेच डायघर भागात रविवारी रात्री घरी परतणाऱ्या महिलांचा विनयभंग करण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या. या दोन्ही घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ठाणे पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी महिला वर्गातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
मुंब्रा भागात राहणारे एक दाम्पत्य रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घोडबंदर रोडने घरी परतत होते. फाऊंटन हॉटेल येथून ठाण्याच्या दिशेने येत असताना पातलीपाडा येथील उड्डाण पुलाजवळ एका कारचालकाने त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर कारमधील तिघांनी दुचाकीवरील २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केला व तेथून पळून गेले. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
दुसऱ्या एका घटनेत डायघर परिसरात राहणारी २५ वर्षीय महिला रविवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घरी परतत होती. त्यावेळी तिच्या इमारतीजवळील रस्त्यावर कारमधून आलेल्या गणेश आंबेकर याने तिला अडविले. मोबाइल का उचलत नाहीस, माझ्याशी का बोलत नाहीस, असे प्रश्न विचारत गणेश याने शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गणेशला अटक केली आहे.
काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचार तसेच छेडछाडीचे प्रकार वाढीस लागले असून असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहिमा हाती घेतल्या आहेत. रोड रोमिओंवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकेही तयार केली आहेत. मात्र, तरीही रोड रोमिओंकडून असे प्रकार सुरूच आहेत.