मध्य रेल्वेप्रमाणे आता पश्चिम रेल्वेवरही सुविधा

उपनगरीय प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वेनेही ‘मिस्ड कॉल अलर्ट’ सुविधा सुरू केली आहे. या सुविधेनुसार उपनगरीय प्रवाशांनी टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास प्रवाशांना उपनगरीय गाडय़ांच्या स्थितीबाबत लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) माहिती पुरवण्यात येईल. ही सुविधा नि:शुल्क असेल.

उपनगरीय रेल्वे मार्गावर बिघाड होण्याची घटना मुंबईत आठवडय़ातील सात दिवस घडते. त्यामुळे पश्चिम तसेच मध्य रेल्वेचे वेळापत्रक नेहमीच विस्कळीत होते. याबाबत प्रवाशांना माहिती मिळत नसल्याने स्थानकांवर आलेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल होतात. मात्र ही माहिती घरबसल्या मिळवणे आता एका मिस्ड कॉलद्वारे शक्य होणार आहे. यासाठी प्रवाशांना १८००२१२४५०२ या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. प्रवाशांनी या क्रमांकावर फोन केल्यानंतर दोन वेळा फोन वाजून तो आपोआप बंद होईल आणि प्रवाशांना एसएमएस प्राप्त होईल. गाडय़ा किती उशिराने धावत आहेत किंवा बिघाड दुरुस्त होण्यास किती वेळ लागेल ही माहिती संक्षिप्त स्वरूपात मिळेल.