गोष्ट ऐकायला कोणाला आवडत नाही.. लहान मुले असो किंवा अगदी आजी-आजोबा असोत.. एवढेच नव्हे तर प्रत्येक मोठय़ा माणसात एक लहान मूल दडलेले असते आणि कोणी तरी गोष्ट ऐकवा.. गोष्ट ऐकवा, असा कमी-जास्त प्रमाणात सर्वाचाच हट्ट असतो. आता हाच हट्ट पुरवून घेण्यासाठी एका मिस्ड कॉलवर मोफत गोष्ट ऐकण्याची सोय ‘प्रथम बुक्स’ने केली आहे. यात मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि तेलगू भाषेत लहान मुलांसाठी विविध गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. यासाठी ०८०-३९२-३६२२२ हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि तेलगू भाषेत गोष्ट ऐकण्यासाठी पर्याय दिला जातो. यात आपल्या आवडीची भाषा निवडल्यानंतर चार ते पाच मिनिटांची गोष्ट रसिकांना ऐकता येते. लहान मुलांना गोष्ट वाचण्यापेक्षा कोणी तरी गोष्ट सांगणे हा त्यांच्या आनंदाचा भाग असतो. याच धर्तीवर ही श्राव्य माध्यमातील पुस्तके तयार करण्यात आली आहेत. भारतीय भाषेतील गोष्टींची पुस्तके लहान मुलांना विनामूल्य ऐकता यावी, यासाठी हा खजिना ‘प्रथम बुक्स’तर्फे उपलब्ध करण्यात आला आहे. अधिकाधिक मुलांपर्यंत चांगली पुस्तके पोहोचविणे या ध्येयाचा एक भाग म्हणून श्राव्य माध्यमातील ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.