तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या नव्या वर्षांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने दिलेले वेळापत्रक राज्यातील महाविद्यालयांना पाळणे शक्य होणार नसल्याचे दिसत आहे. प्रवेश परीक्षेचे विशेष सत्र झाल्यानंतर निकाल आणि प्रवेश प्रक्रिया अशी सर्व प्रक्रिया अवघ्या १५ ते २० दिवसांत होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

देशभरातील सर्व महाविद्यालयांचे अभ्यासक्रम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले. मात्र, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने तंत्रशिक्षण महाविद्यालयांना काहीसा दिलासा देत ही मुदत १ डिसेंबर केली. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये राज्यातील सर्व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ज्या विद्यार्थ्यांना नियमित वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा झाल्यानंतर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल, असे प्रवेश परीक्षा कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या होऊ शकतील. परीक्षा, निकाल आणि दिवाळीचे दिवस वगळून प्रत्यक्ष प्रवेश फेऱ्यांसाठी १० ते १५ दिवसच मिळू शकतील. त्यात विद्यार्थ्यांची नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, प्रवेश फेऱ्या हे सगळे पार पाडण्याचे आव्हान प्रवेश परीक्षा कक्षासमोर आहे.

आरक्षणाच्या गोंधळाचाही फटका

न्यायालयाच्या निकालानुसार नव्याने होणाऱ्या प्रवेशांसाठी मराठा आरक्षणाची तरतूद लागू करणे अपेक्षित नाही. मात्र, तरीही अद्याप त्याबाबत स्पष्टीकरण आलेले नाही. त्याबाबत ठोस स्पष्टीकरण न आल्यास अधिक वेळ जाऊ शकतो. असे झाल्यास परिषदेने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून महाविद्यालये सुरू करणे अवघड आहे, असे मत तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

परिषदेने दिलेल्या मुदतीत सर्व प्रवेश प्रक्रिय पूर्ण करून अध्यापन सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अद्याप मुदत वाढवून घेण्याबाबत काहीच विचार झालेला नाही. फेरपरीक्षेचे सविस्तर वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल.

– पंकज कुमार, आयुक्त, प्रवेश नियमन प्राधिकरण