खर्चात १० कोटी रुपयांनी वाढ; प्रशासनाची स्थायी समितीकडे धाव

मुंबई : मुंबईच्या शहर भागातील १० पुलांच्या किरकोळ दुरुस्तीची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. मात्र या पुलांच्या दुरुस्तीच्या खर्चाचा अंदाज चुकला असून नव्या सल्लागाराने दिलेल्या अहवालानुसार दुरुस्तीच्या खर्चामध्ये तब्बल १० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीव खर्चाला मंजुरी मिळावी यासाठी प्रशासनाने स्थायी समितीकडे धाव घेतली आहे.

शहरातील जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपूल दादर, जीटीबी रेल्वेवरील उड्डाणपूल, नाना फडणवीस रेल्वेवरील उड्डाणपूल, नानालाल डी. मेहता आणि तुळपुळे उड्डाणपूल, शीव रुग्णालयासमोरील उड्डाणपूल, किंग्ज सर्कल (दक्षिण) पादचारी पूल, किंग्ज सर्कल (उत्तर) पादचारी पूल, भाऊ दाजी पादचारी पूल, गुरुनानक हायस्कूलसमोरील पादचारी पूल यांची किरकोळ दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. हे काम ए. पी. आय. सिव्हिलकॉन कंपनीला २४ कोटी दोन लाख ३७ हजार ६५८ रुपयांचे कंत्राट देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर स्थायी समितीने ९ जानेवारी २०१९ रोजी मंजुरीची मोहोर उमटविली होती. पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू करण्याचा कार्यादेश २८ फेब्रुवारी २०१९ रोजी देण्यात आला होता. त्यानुसार कामे सुरू झाली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईमधील समस्त उड्डाणपूल आणि पादचारी पुलांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. शहर भागांतील पुलांच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या स्ट्रक्टवेल डिझाइनर्स अ‍ॅण्ड कन्स्टल्टंटस् या सल्लागार कंपनीने पुलांच्या दुरुस्तीबाबत नवा अहवाल आणि दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले. नव्या सल्लागाराने सादर केलेल्या उड्डाणपूल, पादचारी भुयारीमार्ग आणि पादचारी पुलांच्या कामांच्या अंदाजपत्रकानुसार खर्चात आणखी १० कोटी दोन लाख ५४ हजार ६२६ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरांतील या पुलांच्या किरकोळ दुरुस्तीचा खर्च तब्बल ३४ कोटी चार लाख ९२ हजार २८४ रुपयांवर पोहोचला आहे.

पूर्वी मंजूर केलेल्या २४ कोटी दोन लाख ३७ हजार ६५८ रुपयांच्या मूळ कंत्राटात फेरफार करून ३४ कोटी चार लाख ९२ हजार २८४ रुपये खर्चाचा नवा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. या वाढीव खर्चास मंजुरी मिळावी म्हणून प्रशासनाने फेरफार प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केले आहे.

किडवाई मार्गावरील पुलाच्या खर्चातही वाढ

शिवडी रेल्वे स्थानकाजवळील आर. ए. किडवाई मार्ग ओलांडणाऱ्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीच्या खर्चातही वाढ झाली आहे. या पादचारी पुलाला अतिरिक्त दोन जिने बसवावे लागणार आहेत. त्यामुळे या पुलाच्या पुनर्बांधणीच्या खर्चात २१ लाख २६ हजार ८४५ रुपये वाढ झाली आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीचे कोटी ४३ लाख ८६ हजार ७७५ रुपयांचे कंत्राट स्वस्तिक कन्स्ट्रक्शन्स कंपनीला २ फेब्रुवारी २०१८ रोजी देण्यात आले होते. हे काम ९ मार्च २०१८ पासून सुरू करण्याचे कार्यादेशही कंत्राटदाराला देण्यात आले होते. काही तांत्रिक कारणाने या पुलाच्या उंचीमध्ये वाढ झाली आहे. परिणामी अतिरिक्त दोन जिने बसवावे लागणार आहेत. त्यामुळे खर्चात वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.