डोंबिवली येथील आयरे गावातून बेपत्ता झालेल्या नऊ वर्षीय मुलीचा तब्बल अडीच वर्षांनंतर शोध लागला असून ती ठाण्यातील एका अनाथ आश्रमात राहत होती. ठाणे पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या तपासामुळे तिची कुटुंबासोबत पुनर्भेट झाली आहे. दरम्यान, ही मुलगी शाळा शिकत असल्याने तिचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून वार्षिक परीक्षेनंतर तिला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आयरे गावात राहणाऱ्या मनोज पांडे यांना तीन मुली आहेत. त्यांपैकी लहान मुलगी मोनिका (९) ही अडीच वर्षांपूर्वी अचानकपणे बेपत्ता झाली होती. खेळत असताना मोनिका रेल्वे स्थानकात आली आणि तिथून ती रेल्वेने चाळीसगाव येथे गेली होती. वाट चुकल्याने तिथे रडत असताना ती पोलिसांना सापडली. मात्र, तिच्या कुटुंबाविषयी काहीच माहिती मिळत नसल्याने पोलिसांनी तिला बाल सुधारगृहात ठेवले होते. तीन महिन्यांनंतर तिला भिवंडीतील सुधारगृहात पाठविण्यात आले होते. कुटुंबाचा शोध लागत नसल्याने तिला अखेर वर्तकनगर परिसरातील एका आश्रमात ठेवण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीच्या वर्गात ती शिकत आहे. दरम्यान, ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या महिला पोलीस कर्मचारी प्रतिमा मनोरे आणि रोहिणी सावंत या  आश्रमामध्ये गेल्या असता त्यांनी चौकशी केली. त्या वेळी मोनिकाने आपण डोंबिवलीत राहत असल्याचे सांगितले डोंबिवलीमधील काही गावांची नावे सांगताच आयरे गावात राहत असल्याची जुजबी माहिती तिने दिली. त्या आधारे आयरे गावात तिच्या कुटुंबाचा शोध सुरू केला आणि त्यांना नागरिकांच्या मदतीने तिचे कुटुंब सापडले, अशी माहिती ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली.