राज्य दहशतवादविरोधी पथकाची(एटीएस) बोलेरो जीप तब्बल दोन आठवडय़ांनंतर भिवंडी बायपास मार्गावर बेवारस अवस्थेत सापडली. ‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार एटीएसच्याच अधिकाऱ्यांना जीप बेवारस अवस्थेत घोडबंदर परिसरात असल्याचा सुगावा लागला. मात्र ती चोरणाऱ्याचा शोध अद्याप लागलेला नाही. याआधीही चोरीला गेलेली पोलीस वाहने बेवारस अवस्थेत मुंबईबाहेर सापडली. मात्र ती चोरणारा एकही हात अद्याप पोलिसांच्या बेडीत अडकलेला नाही. त्यामुळे ही जीप चोरणारे गजाआड करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर असेल.

एटीएसच्या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याला जोडून दिलेली बोलेरो जीप २३ फेब्रुवारीच्या पहाटे टिळकनगर परिसरातून चोरी झाली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरूच केलाच, पण गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षानेही शोधाशोध सुरू केली. शहरातील सर्व सीसीटीव्हींचे चित्रण पडताळण्यात आले. २३च्या पहाटे ही जीप मुलुंड टोल नाका ओलांडताना दिसली.  यात एटीएसच्याच खबऱ्यांनी जीप भिवंडी बायपास मार्गावरील लोढा संकुलाजवळ बेवारस उभी असल्याची माहिती आणली. त्यानुसार एटीएस अधिकाऱ्यांनी जीप ताब्यात घेत ती पुढील तपासासाठी टिळकनगर पोलिसांच्या हवाली केली. परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी जीप हस्तगत केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. चोरांचा शोध सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.  मात्र अधिक माहिती देण्यास नकार दिला.जीप आणि जीपमधील पोलीस लॉग बूक सुस्थितीत आहे. चोरटय़ांनी जीप सुमारे दीडशे ते दोनशे किलोमीटर फिरवून बेवारस सोडली, अशी माहिती मिळते.

चोरांना पकडण्याचे आव्हान

याआधी एटीएसच्या ठाणे कक्षाची, गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाची, मुंबईच्या दोन तत्कालिन पोलीस आयुक्तांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेली, मंत्रालय सुरक्षा विभागाच्या ताफ्यातली बोलेरो जीप चोरांनी मुंबईच्या विविध भागातून चोरल्या. त्या अशाच प्रकारे बेवारस अवस्थेत सापडल्या. हे वाहन पोलिसांचे आहे याचे संकेत मिळताच चोरांनी त्या बेवारस सोडून धूम ठोकली. पण एकाही प्रकरणात त्या चोरांना पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे एटीएसची जीप चोरणाऱ्यांना पकडण्याचे खरे आव्हान पोलिसांसमोर असेल.