विदर्भ या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला रोखण्याकरिता राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केल्याच्या पाश्र्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला रोखायचे हे काँग्रेसचे मिशन कोल्हापूरपाठोपाठ सांगलीमध्येही यशस्वी ठरले आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे काँग्रेसच्या गोटात खुशीचे वातावरण आहे. राष्ट्रवादीची राजकीय घोडदौड रोखायची असल्यास आधी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला रोखले पाहिजे अशी काँग्रेसची व्यूहरचना आहे.
गेल्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्य़ातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या. सांगलीतील विजयाने काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. सातारा जिल्ह्य़ात उदयनराजे भंोसले हे बरोबर राहणार नसल्यास तेथेही राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढू शकते. सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादी व काँग्रेस लढाई सुरूच आहे. नगरमध्ये परस्परांवर कुरघोडी करण्याची स्पर्धाच लागलेली असते. पुणे वगळता पश्चिम महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला सर्वत्र आव्हान उभे राहू लागले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कायम राहणार असली तरी आतापासूनच काँग्रेसच्या गोटात राष्ट्रवादीबद्दल संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.  
याचीच पुनरावृत्ती आगामी लोकसभा निवडणुकीत होण्याची चिन्हे आहेत.

जयंत पाटील यांचे काय होणार ?
सांगलीचा पराभव ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यासाठी राजकीयदृष्टय़ा अडचणीचा ठरणार आहे. जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सूचित करून त्यांच्याबद्दल संशयाचे वातावरण तयार केले. सांगलीच्या पराभवानंतर लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, अशी भूमिका पाटील यांना घेता येणार नाही. पक्षाने आदेश दिल्यास हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल.