रुग्णवाढ मंदावल्याने दोन संस्थात्मक विलगीकरण केंद्रे बंद

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णवाढीचा दर मंदावल्याचे संकेत मिळाल्यामुळे धारावीकरांसाठी सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रांपैकी दोन केंद्रे अखेर बंद करण्यात आली. ‘मिशन धारावी’च्या यशामुळे करोनाचे उच्चाटन होण्याच्या दिशेने धारावीची वाटचाल सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असे बिरुद मिरवणाऱ्या धारावीमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले होते. साधारण आठ लाख लोकसंख्येला सामावून घेणारी दाटीवाटीने उभी असलेली ही वस्ती. छोटय़ा छोटय़ा अरुंद वाटा, अगदी लहान एकमेकांना खेटून उभी घरे असलेल्या या सुमारे २.५ चौरस किलोमीटर क्षेत्रावरील वस्तीत विलगीकरणाचा मोठा प्रश्नच होता. करोनाचे उच्चाटन करण्यासाठी ‘मिशन धारावी’अंतर्गत घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली. खासगी दवाखाने आणि पालिकेचे दवाखाने सुरू केले. खासगी डॉक्टरांची मदत घेतली. तसेच मोबाइल दवाखाने आणि ताप शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या सर्व यंत्रणांच्या माध्यमातून धारावीतील तब्बल पाच लाख ४८ हजार ९७० रहिवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

सौम्य आणि मध्यम लक्षणे, लक्षणे नसलेल्या परंतु करोनाची बाधा झालेल्यांसाठी तीन हजार ८१५ खाटांची क्षमता असलेली ‘करोना आरोग्य केंद्र-१’, ६३२ खाटांची क्षमता असलेले ‘करोना काळजी केंद्र-२’, तसेच २६६ खाटांची क्षमता असलेली ‘समर्पित करोना आरोग्य केंद्र’ सुरू करण्यात आली. तसेच अलीकडेच माहीमच्या निसर्गोद्यानासमोर २०० खाटांची क्षमता असलेले करोना आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये धारावीमधील करोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. ‘मिशन धारावी’ला यश येऊ लागल्यामुळे पालिकेने राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू केलेले ३०० खाटांचे ‘करोना काळजी केंद्र-२’, तसेच धारावी म्युनिसिपल शाळेतील ७०० खाटांचे ‘करोना काळजी केंद्र-१’ बंद करण्यात आले आहे. आतापर्यंत धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ९००, तर धारावी म्युनिसिपल शाळेत तीन हजार संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. या केंद्रांमध्ये तीन पाळ्यांमध्ये सहा डॉक्टर, १५ परिचारिका आणि ३० कक्ष परिचर कार्यरत होते.

२,१८९ धारावीतील एकूण करोनाबाधित

१,०६० करोनामुक्त झालेले –

१,०४८  अजूनही उपचार घेत असलेले

११,९८६ करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले आणि विविध यंत्रणांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आलेले

१०,१६५ संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलेले

धारावीतील कमी होत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेऊन ही दोन संस्थात्मक विलगीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. या केंद्रांमधील साधनसामग्री दादर आणि माहीम येथील केंद्रांसाठी वापरण्यात येत आहे.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’