नवी मुंबई पालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या बारा लाख आहे. एका माणसाला सरासरी १५० लीटर पाण्याची आवश्यकता गृहीत धरल्यास या लोकसंख्येला १८० दशलक्ष लीटर पाणी पुरसे आहे. यात वाणिज्य वापर करणाऱ्यांना ४० दशलक्ष लीटर पाणी वापरण्यास दिल्यास शहराला २२० दशलक्ष लीटर पाणी लागते असे दिसून येते, पण नवी मुंबईला मोरबे आणि बारवी धरणातून ४०९ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. याचाच अर्थ १८९ दशलक्ष लिटर पाण्याचा गैरवापर होत असून प्रशासन ही गळती रोखण्यास असमर्थ असल्याची टीका माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
राज्याचा अर्धा भाग भीषण दुष्काळाने होरपळून गेला आहे. पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा म्हणून अनेक पातळीवर प्रबोधन केले जात आहे. रंगपंचमीला लोकांनी दुष्काळाचे भान ठेवून पाण्याचा वापर कमी केला.
 दुष्काळग्रस्त भाग वगळता इतर ठिकाणी पाण्याची बचत केल्याने दुष्काळग्रस्त भागला पाणी मिळेल असे नाही पण त्यामुळे पाण्याचे महत्व अधोरिखित होत आहे.
दुष्काळाच्या निमित्ताने पाण्याचा गैरवापर टाळावा आणि पाणी बचतीची सवय लागावी यासाठी अनेक संस्था प्रयत्न करीत आहेत. मात्र नवी मुंबईत वेगळे चित्र असून गरजेपेक्षा जास्त येणाऱ्या पाण्याचा सर्रास गैरवापर केला जात असून यावर पालिका प्रशासन नियंत्रण मिळविण्यास असर्मथ व कुचकामी ठरली असल्याचा आरोप सर्व भागातून होत आहे.