प्रादेशिक दृष्टिकोनामुळे विषय क्लिष्ट  * अरुणाचल प्रदेश चीनला बहाल!

‘अरुणाचल प्रदेश आमचाच भूभाग’ असा दावा करणाऱ्या चीनला भारताकडून वेळोवेळी चपराक दिली असली तरी आपल्या राज्य शिक्षण मंडळाची मात्र ‘अरुणाचल प्रदेश चीनचाच’ असल्याची खात्री पटली आहे! एवढेच नव्हे तर आपले हे ‘ज्ञान’ त्यांनी दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकाद्वारे नव्या पिढीलाही वाटले आहे. यंदा नव्याने आलेल्या दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकातील नकाशात संपूर्ण अरुणाचल प्रदेश चीनला ‘दान’ करून टाकण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या शालांत जीवनाची शेवटची पायरी व उच्च शिक्षणाचा पाया असलेल्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात भूगोलाच्या पुस्तकात मंडळाने साराच ‘गोलमाल’ केला आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विचार न करता पदव्युत्तर स्तरावर (एमए) अभ्यासला जाणारा ‘भूगोला’विषयीचा गुंतागुंतीचा व क्लिष्ट असा ‘प्रादेशिक’ दृष्टिकोन थेट दहावीच्या विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात आला आहे.

अभ्यासकांचीही नाराजी

दहावी भूगोलाचे हे पुस्तक अतिशय क्लिष्ट असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांच्या पुस्तकांमध्येहीअसा क्लिष्ट दृष्टिकोन अवलंबण्यात आलेला नाही. मग राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्याच माथी प्रादेशिक दृष्टिकोन मारण्याची गरज काय, असा सवाल भूगोलाचे अभ्यासक करीत आहेत.