29 October 2020

News Flash

‘शादी डॉट कॉम’वरील तरुणींच्या ‘प्रोफाइल’चा गैरवापर

यूटय़ूब वाहिन्यांवर ‘शादी डॉट कॉम’वरील तरुणींची माहिती छायाचित्रासह दाखवली जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वैयक्तिक माहितीसह आक्षेपार्ह मजकूर प्रसारित

नमिता धुरी, मुंबई

‘शादी डॉट कॉम’ या प्रसिद्ध संकेतस्थळावरील तरुणींची वैयक्तिक माहिती वापरून आक्षेपार्ह मजकूर असलेल्या चित्रफिती यूटय़ूबवर प्रसारित केल्या जात आहेत. यावरून ऑनलाइन नोंदणीद्वारे विवाह संस्थांचे काम करणारी संकेतस्थळे विवाहोच्छुक तरुण-तरुणींसाठी सुरक्षित नाहीत हेच दिसून येत आहे.

काही यूटय़ूब वाहिन्यांवर ‘शादी डॉट कॉम’वरील तरुणींची माहिती छायाचित्रासह दाखवली जात आहे. त्यात आक्षेपार्ह, अश्लील आणि अश्लाघ्य वाक्यांचा वापर करण्यात आला आहे.

या चित्रफितींच्या बाजूला लिहिलेल्या या वाक्यांमधून  यूटय़ूब वापरकर्त्यांचे अधिकाधिक लक्ष वेधून घेतले जात आहे.  सुरुवातीला ‘शादी डॉट कॉम’चा लोगो यात वापरला जात होता. सामाजिक कार्यकर्ते बिमल त्रिवेदी यांनी वारंवार ग्राहक सेवा क्रमांकावर तक्रार केल्यानंतर या चित्रफिती यूटय़ूबवरून काढून टाकण्यात आल्या. मात्र त्यानंतरही अशा प्रकारचे मजकूर असलेल्या आणि ‘शादी डॉट कॉम’चे प्रोफाइल वापरलेल्या चित्रफिती प्रसारित केल्या जात आहेत. विवाह संस्थांचे काम करणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली व्यक्तीच त्यावरील तरुण-तरुणींची माहिती पाहू शकते. यावरून चित्रफिती प्रसारित करणारी व्यक्ती या संकेतस्थळाची नोंदणीकृत सदस्य असल्याचा अंदाज आहे. ज्या मुलींच्या छायाचित्रांचा गैरवापर करण्यात आला आहे, त्यांनाही याची माहिती नसावी, असे आढळून आले आहे. मुलगी आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून इच्छुकांनी आपली माहिती द्यावी. त्यानंतर चोवीस तासांच्या आत त्यांच्याशी वाहिनीकडून संपर्क साधला जाईल, असे या चित्रफितीमध्ये सांगण्यात येत आहे.  तरुणींचे छायाचित्र, शिक्षण, कौटुंबिक पाश्र्वभूमी, उत्पन्न, इत्यादी माहिती दाखवली जात आहे. त्याबरोबरच आक्षेपार्ह टिप्पणी चित्रफितींमध्ये केलेली पाहायला मिळते.  तरुणींची छायाचित्रे आणि माहिती अशा प्रकारे विवाहनोंद संकेतस्थळांकडून गैरमार्गाने वापरली जात असेल, तर त्यावर नियंत्रण कसे होईल, हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘चित्रफित हटवण्याची सूचना देणार’

‘असा प्रकार प्रथमच घडला असून याबाबत संबंधित विभागाकडे माहिती पाठवली आहे. लवकरच या चित्रफिती हटवण्याची सूचना यूटय़ूबला केली जाईल,’ असे आश्वासन ‘शादी डॉट कॉम’च्या शायनी मिरांडा यांनी दिले आहे. परंतु मुलामुलींच्या चित्रफिती, छायाचित्रे आदींचा गैरवापर होऊ नये यासाठी तुम्ही काय उपाययोजना करत आहात या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2019 3:39 am

Web Title: misuse of girl profile on shaadi com
Next Stories
1 रेल्वेच्या ३५ पुलांची पाहणी पूर्ण
2 शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक
3 ‘सदोष खुबारोपण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्या’
Just Now!
X