18 September 2020

News Flash

आठ वर्षांच्या प्रयत्नांनंतरदेखील ‘मिठी’दूषितच

कारखान्यांमधून सोडण्यात येणारे रसायनयुक्त सांडपाणी, गॅरेज आणि भंगाराच्या गोदामातून भिरकाविण्यात येणारा धातूयुक्त कचरा आणि लगतच्या झोपडय़ांमधून...

| December 1, 2014 03:23 am

कारखान्यांमधून सोडण्यात येणारे रसायनयुक्त सांडपाणी, गॅरेज आणि भंगाराच्या गोदामातून भिरकाविण्यात येणारा धातूयुक्त कचरा आणि लगतच्या झोपडय़ांमधून टाकण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मिठी नदी स्वच्छ करण्यासाठी कोटय़वधींचा खर्च होऊनही ही नदी दूषितच आहे. अद्यापही तिचे स्वरूप नदीपेक्षा मोठय़ा गटारासारखेच आहे.
मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महापुरानंतर सरकारी यंत्रणा जागी झाली आणि विहार-पवई तालावापासून उगम पावणाऱ्या आणि पुढे माहीमच्या खाडीत विलीन होणाऱ्या मिठी नदीकाठी पडलेला अतिक्रमणाचा विळखा दूर करण्यासाठी धावपळ सुरू झाली. नदीकाठी झालेली वस्ती, उभे राहिलेले कारखाने आणि झोपडपट्टय़ांमुळे मिठीचे पात्र अरुंद झाले. नाल्यांतून वाहून आलेला गाळ नदीच्या तळामध्ये साचल्याने खोलीही कमी झाली व ती उथळ झाली. मिठी नदीचे रूपांतर मोठय़ा नाल्यात झाले. स्वच्छ पाण्याची ही नदी रसायनयुक्त पाणी आणि झोपडपट्टय़ा-सोसायटय़ांतून सोडलेल्या  सांडपाण्याने भरून वाहत आहे.
नदीतील प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या झोपडपट्टय़ा, कारखाने हटविण्यासाठी पालिका आणि एमएमआरडीएने धडाका लावला होता, मात्र अतिक्रमण हटविल्यानंतर काही महिन्यांतच पुन्हा त्याच जागी पुन्हा झोपडय़ा-कारखाने दिसू लागले. तर काही कारखान्यांचे मालक आणि झोपडपट्टीवासीयांनी न्यायालयात धाव घेतल्याने मिठीला पडलेली अतिक्रमणाची मिठी सोडविण्यात पालिका-एमएमआरडीए असमर्थ ठरली.
सौंदर्यीकरण आणि नदीकाठ सुरक्षित करण्यासाठी पालिका आणि ‘एमएमआरडीए’ने मिठीच्या दुतर्फा काही ठिकाणी संरक्षक भिंत उभी केली आहे. ही भिंत उभारताना कांदळवनावर कुऱ्हाड कोसळली असून नदीचा नैसर्गिक प्रवाह कोंडला गेला आहे. त्यामुळे प्रदूषित मिठी नदी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक बनली असून मुसळधार पावसात आपली वेस ओलांडून मिठी मुंबईला आपल्या मगरमिठीत घेण्याचा धोका नाकारता येत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

संरक्षक भिंतीमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेला आहे. त्यामुळे प्रथम संरक्षक भिंत तोडावी लागेल. त्यामुळे नदीच्या प्रवाहातील अडथळा दूर होईल, तसेच नदीतील पाणी निर्मळ करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
-जनक दफ्तरी  ‘जल बिरादरी’चे प्रमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 3:23 am

Web Title: mithi river pollution after 8 years
टॅग Mithi River
Next Stories
1 रिपब्लिकन ध्रुवीकरणासाठी आंबेडकर पुन्हा सरसावले?
2 कंपनी वापीत, रासायनिक सांडपाणी कल्याणमध्ये
3 प्रश्नांपेक्षा कैक पटीने उत्तरेही आहेत -सत्यार्थी
Just Now!
X