मिठीबाई, सोमय्यातील लैंगिक छळ प्रकरण

मुंबईतील सोमय्या महाविद्यालयातील माजी आणि  मिठीबाई महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांना महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी निलंबित करून अटक करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सोमय्या महाविद्यालायत प्राचार्य असताना २००७ मध्ये  डॉ. हांडे यांच्या विरोधात त्याच महाविद्यालयातील एका प्राध्यापक महिलेने लैंगिक छळ केल्याची तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात केली होती. परंतु त्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यानंतर तिने महिला आयोगाकडे तक्रार केली. त्याचा राग म्हणून त्या महिलेलाच सेवेतून बडतर्फ करण्यात आले. मात्र तिने आपला लढा चालूच ठेवला. अखेर पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर चक्रे फिरली आणि टिळकनगर पोलिसांनी नव्याने हांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. परंतु पुढे अद्याप काही कारवाई झालेली नाही, असे डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सोमय्या महाविद्यालय सोडून डॉ. हांडे मिठीबाई महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झाले. त्यानंतर डॉ. हांडे यांनी मानसशास्त्रातील एका तज्ज्ञ महिलेशी असेच असभ्य वर्तन केले. त्या महिलनेही जुहू पोलीस ठाण्यात हांडे यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३५४ नुसार हांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. परंतु या प्रकरणातही अद्याप काहीही कारवाई झालेली नाही , असे डॉ. गोऱ्हे निदर्शनास आणले आहे. महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणात डॉ. हांडे यांना अटक करण्याचे पोलिसांना आदेश द्यावेत, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बच्चू कडू यांची संघटनाही मैदानात

महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या प्राचार्य हांडे यांना सेवेतून बडतर्फ करा, तसेच त्यांना अटक करा, या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांची ‘प्रहार’ ही संघटनाही मैदानात उतरली आहे. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड्. मनोज टेकाडे, सरचिटणीस अजय तापकीर, महेश दाभोलकर, आदींनी  राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव मंजूषा मोळवणे यांना हांडे यांच्याविरोधात कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले.