प्रसिद्ध अभिनेता पंकज विष्णू, अभिजित केळकर, अभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्यासह अनेक नामवंतांनी पालघर जिल्ह्य़ातील एका आदिवासी पाडय़ावरील दिवाळी महोत्सवात सहभागी होऊन आदिवासींच्या घरात आनंदाची आणि उत्साहाची पहाट फुलविली. आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या मित्र फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आवारपाडा या आदिवासी पाडय़ावर साजऱ्या करण्यात आलेल्या आगळ्या दिवाळीत, यंदा आदिवासी मुलांनी संगणकाच्या ‘माऊस’वर बोटे चालवून ‘ई-विश्वा’ची अद्भुत सफर अनुभवली, तेव्हा या मुलांच्या डोळ्यात आश्चर्यासोबत आनंदाची किनारही उमटली होती.
मुंबई व ठाणे परिसरांतील कलाकार, पत्रकार तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंतही सहकुटुंब या सोहळ्याचे साक्षीदार झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या स्वप्नाचे अंकुर गावोगावी, खेडोपाडी रुजावेत आणि फुलावेत या उद्देशाने मित्र फाऊंडेशनने यंदाच्या दिवाळीत आदिवासी पाडय़ांवर संगणक देऊन प्रशिक्षणाचीही व्यवस्था केली आहे. या पाडय़ावरील तरुणांना व मुलांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळेलच, पण आपल्यापलीकडच्या जगाशीही त्यांचे नवे नाते जुळेल, असा विश्वास या वेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला.
मित्र फाऊंडेशनतर्फे दर वर्षी आदिवासी पाडय़ांवर दिवाळीनिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. समाजातील शेवटच्या घटकाच्या घरात पहिला दिवा लागला पाहिजे, आनंदाचे काही क्षण त्याच्याही वाटय़ाला हक्काने आले पाहिजेत, या उद्देशाने मित्र फाऊंडेशनचे कार्यकर्ते, हितचिंतक आवर्जून याप्रसंगी उपस्थित राहतात आणि आदिवासींच्या तारपा नृत्यातही सहभागी होतात. मग एकत्रितपणे फराळ केला जातो, आदिवासींसोबत गप्पांचा फड रंगतो. गेल्या चार वर्षांपासून वीज, पाणी, आरोग्य आदी समस्यांचा मागोवा घेत आदिवासींच्या जगण्यात आनंद फुलविण्याचा व समाजाच्या मुख्य प्रवाहाशी नाते जोडण्याचा एक प्रयत्न मित्र फाऊंडेशनच्या वतीने या उपक्रमातून राबविला जातो, असे उपाध्ये म्हणाले.