मुंबई : विधान भवनात झालेल्या प्रचंड गर्दीचा आमदारांनाही फटका बसला. शेवटी ही विधानसभा की रेल्वे स्थानक आहे, असा उद्विग्न सवाल आमदारांकडून सभागृहात करण्यात आला. यावर उद्यापासून गर्दीवर नियंत्रण आणले जाईल, असे अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले.

विधान भवनात बुधवारी प्रचंड गर्दी झाली होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणावर आले होते. यातून विधानसभा सभागृहाबाहेरील लॉबीत चालणे आमदारांना शक्य होत नव्हते. विधानसभेत हा मुद्दा शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. आमदारांना स्वाक्षरी करणे शक्य झाले नाही. कारण तेथेही प्रचंड गर्दी होती. सभागृहाबाहेर चालणेही शक्य होत नाही. रेल्वे स्थानकाप्रमाणे या विधान भवनात गर्दी झाली आहे. रेल्वे स्थानकावर असल्यासारखे वातावरण येथे झाले आहे. या गर्दीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी जाधव यांनी करताच अन्य आमदारांनी त्याचे समर्थन केले.

गर्दीवर नियंत्रण आणण्याची जाधव यांची मागणी योग्यच असून, सारेच आमदार याला पाठिंबा देतील, अशी अपेक्षा अध्यक्ष पटोले यांनी व्यक्त केली. प्रतिदिन मंत्र्यांना पाच, तर आमदारांना दोन प्रवेशिका दिल्या जातील. तसेच प्रवेशिकेवर अभ्यागतांचे छायाचित्रही असेल, असे पटोले यांनी सांगितले.