मंत्रालयात उपसचिवास मारहाण; संतप्त कर्मचाऱ्यांचे कामबंद, बच्चू कडूंवर गुन्हा दाखल
एका शासकीय फाईलवर अनुकूल शेरा मारला नाही म्हणून संतप्त झालेल्या आमदाराने सामान्य प्रशासन विभागातील उपसचिवाला मारहाण करण्याचा गंभीर प्रकार मंगळवारी मंत्रालयात घडला. उपसचिव भा. र. गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मारल्याने मंत्रालयात संतापाची लाट उसळली. कर्मचाऱ्यांनी दुपारपासून उस्फूर्त कामबंद आंदोलन केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे वरिष्ठ अधिकारी व पोलिसांची तारांबळ उडाली. हजारो कर्मचारी व कामासाठी आलेल्या नागरिकांनी मध्यवर्ती आवारात व सर्व मजल्यांवर गर्दी केल्याने दुपारनंतर मंत्रालयातील कामकाज ठप्प झाले.
दरम्यान, मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात आमदार कडू आणि शासकीय कर्मचारी अशोक जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मंत्रालयातील कर्मचारी अशोक जाधव यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकार कोटय़ातील सदनिकेबरोबरच वांद्रे येथील शासकीय वसाहतीतही घर आहे. याबाबत तक्रार अर्ज आल्यावर गावित यांनी चौकशी करून नियमानुसार मुंबईत घर असताना शासकीय वसाहतीत घर देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. संबंधित प्रकरणाच्या फाइलवर तसे नमूद करून ती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मान्यतेसाठी पाठविली. यासंदर्भात कडू यांनी गावित यांच्या दालनात जाऊन त्यांच्याकडे विचारणा केली. या फाइलवर अनुकूल शेरा का लिहिला नाही, असा जाब कडू यांनी विचारला. त्यावर नियमानुसार तसे करता येणार नाही, असे उत्तर गावित यांनी दिले. यामुळे संतापलेल्या कडू यांनी गावित यांना चार-पाच थपडा मारल्या, अशी माहिती अधिकारी संघटनेचे पदाधिकारी व उपसचिव सतीश जोंधळे यांनी दिली.
गावित यांना उच्चरक्तदाबाचा त्रास असल्याने तो वाढला व मधुमेह असल्याने अस्वस्थ वाटू लागले. त्यांना लगेच रुग्णवाहिकेतून सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. मारहाणीची घटना समजल्यावर संघटनेचे अध्यक्ष आर. के. धनावडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आवाहन केल्यावर हजारो कर्मचारी काम सोडून तळमजल्यावर मध्यवर्ती आवारात जमले. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. याबाबत कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही निवेदन दिले.

कडूंवर कारवाई करणार -खडसे
मारहाणप्रकरणी मुख्य सचिवांकडून चौकशी केली जाईल आणि कोणाचीही गय न करता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी या मारहाणीचा मुद्दा उपस्थित केला.

कडू यांनी शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा हा तिसरा प्रकार आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मंत्रालय अधिकारी संघटनेने केली आहे.