भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी तसेच मुंबईतील दादर येथील इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासंदर्भात लाखोंच्या संख्येने आंबेडकरी समाज जमला होता. मात्र मानवंदना देऊन घरी परतणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवर अमानुष हल्ला केला गेला, दगडफेक करण्यात आली होती. समाजकंटकांनी योजनाबद्धरीतीने अनेक गाड्यांची तोडफोड केली व जाळपोळ केली. या हल्ल्यात अनेक बांधव जखमी झाले होते. या प्रकारामुळे दलित समाज अस्वस्थ झाला होता.  या प्रकारचा  निषेध करण्यासाठी राज्यभरातील दलित समाज स्वयंस्फुर्तीने रस्त्यावर उतरला होता. तत्कालीन सरकारविरोधातील खदखद व्यक्त करण्यासाठी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो तरूणांवर व महिलांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत अनेक महिला, युवक आणि कार्यकर्ते यांच्यावर गंभीर गुन्हे मागील सरकारने दाखल केले आहेत. शिवाय इंदू मिल आंदोलनातील युवकांवरही गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत आणि दलित समाजाला न्याय द्यावा, अशी मागणीही आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे.दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणी गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे.