‘ही इमारत राहण्यास धोकादायक असून, जीवितहानी वा गंभीर इजा झाल्यास यात वास्तव्य करणारे जबाबदार असतील’, असा फलक एखाद्या चाळी किंवा जुनाट इमारतीबाहेर नव्हे तर चक्क कायदे मंडळाच्या सदस्यांचे वास्तव्य असलेल्या आमदार निवासाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी झळकत आहे. अन्य कोणती इमारत असती तर पालिकेचे अधिकारी व पोलीस इमारत खाली करण्यासाठी फौजफाटा घेऊन आले असते, पण आमदार निवास असल्याने इतरांना लागू असलेला नियम बहुधा येथे लागू होत नसावा.
रिगल टॉकिजच्या समोर ब्रिटीशकालीन मॅजेस्टिक आमदार निवास ही इमारत राज्याच्या राजकारणाच्या अनेक घडामोडींची साक्षीदार ठरली आहे. मुख्यमंत्री बदलांचे अनेक खल या वास्तूतच झाले. अशी ही जुनी इमारत सध्या धोकादायक झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या इमारत विभागाने केलेल्या पाहणीत ही ऐतिहासिक आमदार निवासाची इमारत राहण्यास योग्य नाही, असे आढळून आले. इमारतीचे देखभाल करणाऱ्या राज्य शासनाच्याच सार्वजनिक बांधकाम विभागानेही ही इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचा निर्वाळा दिला. आमदार मंडळींना मात्र या जुन्या इमारतीचे जास्त आकर्षण आहे. अलीकडेच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या काही आमदारांनी या इमारतीत निवासाची व्यवस्था करण्याची मागणी विधिमंडळ सचिवालयाकडे केली होती. ‘वर्षां’ या निवासस्थानी राहण्यास जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वास्तव्य या इमारतीतच होते.
 इमारतीची अवस्था  धोकादायक असली तरी आजही हे आमदार निवास गर्दीने भरलेले असते. आमदारमंडळी, गावोगावचे कार्यकर्त्यांचा वावर या इमारतीत असतो. हे सारे लक्षात घेऊनच कोणतीही जीवीतहाना वा गंभीर इजा झाल्यास त्यात राहणारे जबाबदार असतील, असे सांगण्याची वेळ बांधकाम खात्यावर आली आहे.
इमारत रिकामी करणार  – बापट
‘मॅजेस्टिक’ आमदार निवास इमारत राहण्यास धोकादायक असून, शासकीय यंत्रणांनी त्याचा वापर करू नये, अशी सूचना केली आहे. काही माजी आमदारांनी घरे सोडलेली नाहीत. यामुळे सर्व नव्या आमदारांना घरे देताना तारेवरची कसरत करावी लागली. मात्र, आता ही इमारत खाली करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी सांगितले. विधिमंडळाच्या उभय सभागृहांचे पीठासन अधिकारी, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आजच झालेल्या बैठकीत ‘मॅजेस्टिक’चा आढावा घेण्यात आला.
आघाडी सरकारच्या काळात सुचविण्यात आलेले उपाय मार्गी लागू शकले नाही. ‘मनोरा’ निवासस्थानाच्या बाजूला आमदारांसाठी नवी इमारत बांधणे तसेच ‘मॅजेस्टिक’ची पुनर्बांधणी याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती बापट यांनी दिली.