चांगले वागणाऱ्या शाळकरी मुलांना शाबासकी देण्यासाठी हेलिकॉप्टरची फेरी घडवून आणण्याचा ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे आमदार राम कदम यांचा उपक्रम शुक्रवारी बारावीच्या परीक्षा देणाऱ्या १२५ विद्यार्थ्यांना मात्र नाहक मनस्ताप देणारा ठरला.
कदम यांनी घाटकोपरच्या ‘दत्ताजी साळवी मैदाना’त चांगले वागणाऱ्या लहान मुलांची पाट थोपटण्यासाठी खास ‘हेलिकॉप्टर राईड’चे आयोजन केले होते. सकाळी ११.३०च्या सुमारास हा कार्यक्रम मैदानावर सुरू होणार होता. परंतु, या मैदानाला लागूनच ‘पद्मभूमी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा’ आहे. या बैठय़ा शाळेच्या सहा वर्गामध्ये बारावीचे परीक्षा केंद्र असल्याने साडेदहा वाजल्यापासूनच येथे विद्यार्थी येऊन बसले होते. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा तणाव पसरलेला.. पण, वर्गाबाहेर असलेल्या मैदानातील उत्सवी वातावरणाला त्याचे सोयरसुतक कसचे? उलट कार्यकर्त्यांच्या कोलाहली अतिउत्साहामुळे हे चेहरे ‘आता आपल्या परीक्षेचे काय,’ या विचाराने आणखी ताणावले. शाळा आणि मैदानातले अंतर इतके कमी होते की मैदानात उभे राहिलेल्यांना खिडकीतून पेपर लिहित असलेले विद्यार्थीही दिसत होते.  
शेवटी या गोंधळाचा त्रास परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ नये, म्हणून पोलिसांनाच हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी ११ ते २ या परीक्षेच्या वेळेत कार्यक्रम सुरू करण्यास आयोजकांना मनाई केली. त्यानंतर हेलिकॉप्टर राईड परीक्षा संपल्यानंतर म्हणजे दुपारी दोननंतर घेण्याचे ठरले. परंतु, तरीही मैदानावरची गर्दी आणि गोंधळ कमी झाला नाही. उलट तो मिनिटागणिक वाढत गेला.  यात भर घातली ती अचानक ११.४०च्या सुमारास आकाशात सुरू झालेल्या हेलिकॉप्टरच्या घरघरीने. आकाशात एक-दोन घिरटय़ा घातल्यानंतर हेलिकॉप्टर हळुहळू मैदानावर उतरविण्यात आले. त्यानंतर आमदारांचे आगमन झाले. मैदानावरचा कोलाहल वाढतच होता. तोपर्यंत वर्गात बसून इंग्रजीचा पेपर सोडविणाऱ्या १२५ विद्यार्थ्यांचे काय झाले, याची कल्पना करवत नव्हती. दुपारी दोनच्या नंतर विद्यार्थी बाहेर येऊ लागले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.
काही वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी या संदर्भात राम कदम यांना छेडले असता ‘आम्ही परीक्षा संपल्यानंतर कार्यक्रम सुरू करत आहोत,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, कार्यकर्त्यांच्या लगबगीमुळे आणि परीक्षेच्या दरम्यानच हेलिकॉप्टर आल्याने विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचे ते म्हणत आहेत, असे विचारले असता ते उसळले. ‘तुम्हाला प्रत्येक गोष्टीत ‘नीगेटिव्ह अँगल’च कसा दिसतो,’ असे सांगत ‘राष्ट्रहितासाठी पत्रकारिता करा’ असा सल्लाही त्यांनी दिला .