महापालिकेतील सत्तारूढ नगरसेविकांना असुरक्षित वाटावे, अशी परिस्थिती निर्माण करणारे शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांनी आपण अटकपूर्व जामीन घेणार नाही, अशी राणाभीमदेवी थाटात घोषणा पत्रकार परिषदेत केली होती. त्याच वेळी स्वत: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन नगरसेविकांना दिले होते. त्यांच्या आश्वासनावर विसंबून राहिलेल्या नगरसेविकांच्या पदरात अपेक्षेप्रमाणे काहीच पडले नाही. आणि दरम्यान घोसाळकर यांनीही आपली घोषणा म्यानात घालत गुरुवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने त्यांना ११ मार्चपर्यंत अटक करू नये, असे आदेश देत तात्पुरता दिलासा दिला.
विनोद घोसाळकर आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि भाजप नगरसेविका मनीषा चौधरी यांनी केली होती. शीतल म्हात्रे यांनी घोसाळकरांविरुद्ध पोलिसातही तक्रार केली. घोसाळकर पिता-पुत्रांपासून आपल्याला धोका असल्याचा दावा त्यांनी केला होता. अन्य पक्षाच्या नगरसेविका आणि महिला कार्यकर्त्यांनी मोर्चे काढून पोलिसांना घोसाळकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते.