16 December 2017

News Flash

२०१२ चे मुहूर्त पाळण्यात ‘एमएमआरडीए’ अपयशी

मुंबईतील पायाभूत सुविधा क्षेत्रांत २०१२ हे वर्ष ऐतिहासिक ठरेल, या वर्षी मेट्रो रेल्वे, मोनोरेल

स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ , मुंबई | Updated: December 24, 2012 2:52 AM

मुंबईतील पायाभूत सुविधा क्षेत्रांत २०१२ हे वर्ष ऐतिहासिक ठरेल, या वर्षी मेट्रो रेल्वे, मोनोरेल धावताना दिसेल, अशा एक ना अनेक घोषणा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केल्या. परंतु, २०१२ संपत असताना मुंबईत ना मेट्रो रेल्वे धावली ना मोनोरेल. प्रकल्प पूर्ण होण्याचे मुहूर्त हुकण्याची दुर्दैवी परंपरा सुरूच राहिली, ‘एमएमआरडीए’च्या साऱ्या घोषणा हवेतच विरल्या.
मुंबई आणि महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मेट्रो रेल्वे, मोनोरेल, पूर्व मुक्त मार्ग प्रकल्प, सहार उन्नत मार्ग, मिलन सबवे येथील उड्डाणपूल, असे प्रकल्प राबवले जात आहेत. हे सारे प्रकल्प २०१२ मध्ये पूर्ण होतील व त्यांचा लाभ मुंबईकरांना व महानगर प्रदेशात राहणाऱ्यांना मिळेल, असे प्राधिकरणाने डिसेंबर २०११ च्या शेवटी जाहीर केले. मुंबईकरांना नवीन वर्षांचे आशादायक चित्र दाखवले. पण वास्तवात बर्फीवाला उड्डाणपुलाची उत्तरेकडील मार्गिका व पनवेल येथील उड्डाणपूल वगळता इतर प्रकल्प जाहीर केल्याप्रमाणे कार्यान्वित करण्यात प्राधिकरण अपयशी ठरले.
वसरेवा- अंधेरी- घाटकोपर या ११.४ किलोमीटर लांबीच्या मार्गावर बांधण्यात येत असलेल्या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेचे काम सप्टेंबर २०१२ पर्यंत पूर्ण होऊन डिसेंबर २०१२ अखेर मेट्रो रेल्वे धावू लागेल, अशी ग्वाही देण्यात आली होती. पण मेट्रो रेल्वे धावणे तर दूरच या प्रकल्पासाठीच्या मार्गाचे बांधकामही अद्याप पूर्ण झालेले नाही. उलट बांधकाम सुरू असताना मोठा अपघात मात्र झाला. त्यात एका मजुराला जीवही गमवावा लागला. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चाचणी, प्रमाणपत्र आदी अनेक अडचणी असतात. त्यामुळे आता सप्टेंबर २०१३ चा वायदा करण्यात येत आहे.
जी कथा मेट्रो रेल्वेची तीच मोनोरेलची. चेंबूर ते वडाळा आणि पुढे संत गाडगे महाराज चौक १९.५४ किलोमीटर लांबीची मार्गावर केवळ मुंबईतीलच नव्हे तर भारतातील पहिला मोनोरेल प्रकल्प उभारला जात आहे. त्याचा सुमारे नऊ किलोमीटरचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा २०१२ मध्ये कार्यान्वित होईल, असे जाहीर झाले. मोनोरेल धावली, पण केवळ चाचणीसाठी. अद्याप या पहिल्या टप्प्यावरील मोनोरेलच्या सात स्थानकांचे काम पूर्णपणे झालेले नाही, अंतिम टप्प्यात आहे. आता मार्च-एप्रिल २०१३ ची चर्चा आहे.
मेट्रो रेल्वे आणि मोनोरेलबरोबरच पूर्व उपनगरांना थेट दक्षिण मुंबईशी जोडणारा पूर्व मुक्त मार्ग प्रकल्पही २०१२ मध्ये पूर्ण होऊ शकला नाही. पी. डिमेलो रस्त्यापासून आणिक आगापर्यंत ९.३ किलोमीटर लांबीचा मार्ग, पाच किलोमीटरचा आणिक ते पांजरापोळ जोड रस्ता आणि पांजरापोळ ते घाटकोपर हा अडीच किलोमीटरचा टप्पा असा एकूण १६.८ किलोमीटर लांबीच्या पूर्व मुक्त मार्ग प्रकल्पाचे कामही सुरूच आहे. आणिक- पांजरापोळ जोड रस्त्यावरील दोन बोगदे जून २०१२ पर्यंत तर संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०१२ पर्यंत पूर्ण होणार, अशी घोषणा करण्यात आली होती. पण संपूर्ण प्रकल्प तर दूर अद्याप त्या दोन बोगद्यांचेही काम पूर्ण झालेले नाही. मार्च २०१३ पर्यंत हे बोगदे होतील, अशी आशा आहे.
दरवर्षी पावसाळय़ात पाणी साचल्यामुळे मिलन सबवे येथील वाहतूक कोंडी होते. तिच्यावर उतारा म्हणून ७०० मीटर लांबीचा आणि चार पदरी असा उड्डाणपूल सांताक्रूझच्या रेल्वेमार्गावर मे- जून २०१२ पर्यंत बांधून पूर्ण होईल, ही घोषणाही हवेत विरली. आता मे २०१३ चा मुहूर्त सांगितला जात आहे.
मुंबईतील हे सर्व पायाभूत सुविधा विकास प्रकल्प २०१२ मध्ये पूर्ण करण्यात ‘एमएमआरडीए’ सपेशल अपयशी ठरले. केवळ प्रकल्प कार्यान्वित झाले नाहीत इतकाच विषय नसून या विलंबाचा दिवसागणिक त्रास मुंबईकरांना होत आहे. प्रकल्पांचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, खराब रस्ते हेच मुंबईतील प्रवासाचे चित्र झाले आहे. आता निदान २०१३ मध्ये तरी या त्रासातून मुंबईकरांची सुटका होईल काय, असा प्रश्न आहे.

First Published on December 24, 2012 2:52 am

Web Title: mmrada fail to run metro and mono rail in 2012