X

इमारतींना तडे मेट्रोच्या कामांमुळे नाहीत!

मुंबईच्या भूगर्भातून मेट्रो नेण्यासाठी दक्षिण मुंबईत सध्या मोठय़ा प्रमाणावर पाइलिंगचे काम सुरू आहे.

मेट्रो प्रकल्प संचालक एस के गुप्ता यांचा दावा; २१०० इमारतींचे परीक्षण

मेट्रो-३चे काम सुरू असलेल्या आजूबाजूच्या इमारतींना भेगा पडल्याच्या तक्रारी असल्या तरी त्या मेट्रो-३च्या मार्गिकेचे काम सुरू होण्यापूर्वीच्या आहेत. या संदर्भातील सर्व कागदपत्रे आमच्याकडे असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल)ने केलेल्या इमारत परीक्षणात याची नोंद करण्यात आल्याचा दावा प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता यांनी केला आहे.

मुंबईच्या भूगर्भातून मेट्रो नेण्यासाठी दक्षिण मुंबईत सध्या मोठय़ा प्रमाणावर पाइलिंगचे काम सुरू आहे. या कामांमुळे आसपासच्या इमारतींना तडे जात असून स्थानिक रहिवाशांना ध्वनिप्रदूषणाचाही त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात आहेत. या मार्गातील इमारतींची सद्य:स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी एमएमआरसीएलने मार्गालगतच्या दोन्ही बाजूंच्या ५० मीटर अंतरावरील इमारतींच्या मजबुतीचे परीक्षण करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मार्गातील सुमारे २१०० इमारतींचे परीक्षण केले जाणार आहे.

ऑनलाइन यंत्रणेद्वारे देखरेख

कुलाब-वांद्रे-सीप्झ या मार्गावर मेट्रो-३चे काम सुरू आहे. या कामांदरम्यान काही जुन्या इमारती व वारसा इमारतींना कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचू नये यासाठी कंपनीतर्फे ऑनलाइन देखरेख ठेवली जाणार आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीवर जी उपकरणे लावली जाणार आहेत त्याच्या नोंदी एकत्रित उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये जर कुठे प्रमाणापेक्षा जास्त बदल आढळून आला तर त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल. ऑनलाइन देखरेखीमुळे वेळच्या वेळी कार्यवाही करणे शक्य होणार आहे. ही सेवा अद्याप सुरू करण्यात आली नसून गरजेनुसार ती सुरू केली जाणार आहे.

  • Tags: metro-3, metro-work,
  • Outbrain