वरळी किनाऱ्याजवळील कामासाठी जनसुनावणी घेण्याच्या ‘एमएमआरडीए’ला सूचना

मुंबईतील पूर्व-पश्चिम वाहतूक कोंडी कमी करणारा प्रस्तावित वरळी-शिवडी उन्नत मार्ग पर्यावरणाच्या कचाटय़ात सापडण्याची शक्यता आहे. या मार्गास २१ महिन्यांपूर्वी मंजुरी मिळूनदेखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. आता या प्रकल्पाच्या किनारी भागातील कामासाठी जनसुनावणी घ्यावी लागणार आहे.

गेल्या काही वर्षांत मुंबईतील अनेक कामांसाठी पर्यावरणाच्या मुद्दय़ांवरून होणाऱ्या जनसुनावणींमध्ये प्रशासनास नागरिकांच्या रोषास तोंड द्यावे लागले आहे. आरेचा मुद्दा तर ताजाच आहे. नरिमन पॉइंट ते वांद्रे वरळी सेतूदरम्यानचा मुंबई सागरी किनारा मार्गही पर्यावरणाच्या परवानग्यांमुळे वर्षभर चर्चेत होता. त्यात महाआघाडीचे सरकार अनेक मुद्दय़ांवर प्रकल्पांचा फेरआढावा घेत आहे. त्यामुळे अजूनही कामास सुरुवात न झालेल्या वरळी-शिवडी या उन्नत मार्गाचे भवितव्य काय असेल हा प्रश्न उपस्थित होत आहे.

उन्नत मार्गाचा वरळी येथील भाग सागरी हद्द नियंत्रण कायद्याअंतर्गत (सीआरझेड) येतो. त्यामुळे वरळी सी फेस येथील नागरिकांसाठी ही जनसुनावणी घेण्यात येणार आहे. नागरिकांनी सूचना, आक्षेप ३१ डिसेंबपर्यंत एमएमआरडीएकडे पाठवणे गरजेचे आहे. त्यावर आधारित जनसुनावणी एमएमआरडीएच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयात ७ जानेवारीला होणार आहे.

वरळी ते शिवडी या ४.५१ किमी लांबीच्या उन्नत मार्गाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत २७ फेब्रुवारी २०१८ ला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार या प्रकल्पाचा खर्च १२७८ कोटी इतका आहे. मात्र कामाला सुरुवात झालेली नाही. त्यातच महाराष्ट्र सागरी किनारा विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने एमएमआरडीएला किनाऱ्यावरील बांधकामाच्या अनुषंगाने जनसुनावणी घ्यायला सांगितले आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांनी जनसुनावणी घेण्याच्या सूचनेबद्दल दुजोरा दिला.

मुंबईतील दाटीवाटीच्या वस्तीतून हा मार्ग जात असल्याने याचे काम किचकट आहे. या उन्नत मार्गासाठी अनेक विभागांच्या परवानग्या आवश्यक असून ती प्रक्रिया सुरू आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वाहतूक विभाग आणि मुंबई महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण या विभागांकडून परवानग्या आवश्यक आहेत.

४.५१ किमीचा मार्ग

पूर्व-पश्चिम वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच हा उन्नत मार्ग वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड या दोन महत्त्वाच्या मार्गाना जोडणार आहे. शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून उन्नत मार्गास सुरुवात होणार असून आचार्य दोंदे मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, ड्रेनेज चॅनेल रोड या मार्गावरून जात नारायण हर्डीकर मार्ग येथे समाप्त होईल. चार मार्गिका असणारा हा उन्नत मार्ग ४.५१ किमीचा आहे. शिवडी रेल्वे स्थानक, मुंबई पोर्ट ट्रस्ट मार्ग आणि प्रभादेवी रेल्वे स्थानक येथे रेल्वे मार्गावरून जाणारा आरओबी प्रस्तावित आहे.