प्रकल्पाला आर्थिक बळकटी देण्याचा प्रयत्न; पडीक जागेवर तीन बहुमजली इमारती बांधण्याचा निर्णय

अक्षय मांडवकर, मुंबई</strong>

मोनो प्रकल्पाला आर्थिक बळकटी मिळावी यासाठी वडाळ्यातील मोनो कार डेपोमधील अतिरिक्त जागेचा व्यावसायिक व निवासी कारणांसाठी वापर करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला होता. त्यासंबंधीचा अभ्यास पूर्ण झाला असून डेपोतील पडीक जागेवर

तीन बहुमजली इमारती बांधण्यात येणार आहेत. यामधील बहुतांश जागा व्यावसायिक कंपन्यांना भाडेतत्त्वावर दिल्या जातील. तर काही जागा निवासी तत्त्वावर उपलब्ध होतील.

एमएमआरडीएने आता मोनो प्रकल्प ताब्यात घेऊन स्वत:च राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हावा यासाठी, एमएमआरडीए प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. त्यासाठी उत्पन्नाचे विविध मार्ग शोधले जात आहेत. हा प्रकल्प राबविणाऱ्या ‘स्कोमी’ची अकार्यक्षमतेमुळे हकालपट्टी केल्यानंतर या प्रयत्नांना जोर आला आहे. वडाळ्यातील मोनो कार डेपोमधील पडीक जागेचा व्यावसायिक तत्त्वावर वापर करण्याचा एमएमआरडीएचा विचार होता.

मोनो कार डेपोचे मुख्य बांधकाम वगळता येथील ६.९ हेक्टर क्षेत्र मोकळे आहे. या मोकळ्या जागी व्यावसायिक आणि निवासी स्वरूपाचे बांधकाम करून ते भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. हा विकास कसा करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी ‘प्राइस वॉटर कूपर’ (पीडब्लूसी) या सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थेने अभ्यास करून त्यासंबंधीचा अहवाल एमएमआरडीएला सादर केला आहे. वडाळ्यातील मोनो कार डेपोतील अतिरिक्त जागेवर तीन बहुमजली इमारती बांधण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. या इमारतींमधील काही जागा निवासासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यातील काही घरे प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचा विचार आहे. तर बहुतांश जागा व्यावसायिक कंपन्यांना भाडेतत्त्वावर देण्यात येणार असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

इतर उपाययोजना

’ मोनोची स्थानके, डब्ब आणि खांब खासगी जाहिरातदारांसाठी खुले करणे.

’ टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून मोनो स्थानकांवर मोबाइल कंपन्यांना त्यांचे टॉवर उभारण्यासाठी परवानगी देणे. यातून साधारण १० ते ८ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित.

’ स्थानकांच्या छतावर सौरऊर्जा यंत्रणा लावून निर्माण झालेली अतिरिक्त ऊर्जा विकणे