26 January 2021

News Flash

‘टॉप्स ग्रुप’कडून ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटात घोटाळा

५० टक्के नफा प्रताप सरनाईक यांनी लाटला; ‘ईडी’चा न्यायालयात दावा

(संग्रहित छायाचित्र)

‘टॉप्स ग्रुप’ (सिक्युरीटी) कंपनीचे प्रमुख राहुल नंदा यांचे कथीत आर्थिक गैरव्यवहार तपासणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी रात्री अमित चांदोले याला अटक केली. ‘एमएमआरडी’एला सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या कंत्राटात घोटाळा करून त्यातील ५० टक्के नफा किंवा वाटा चांदोलेच्या माध्यमातून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लाटला, असा दावा गुरुवारी ईडीने न्यायालयात केला.

गेल्या सहा वर्षांत या कंत्राटातील दलालीपोटी टॉप्स कंपनीच्या खात्यातून चांदोलेला सात कोटी रुपये देण्यात आले, असा संशय ईडीने व्यक्त केला आहे.

२०१४मध्ये सरनाईक यांना हाताशी धरत ‘टॉप्स ग्रुप’चे प्रमुख नंदा यांनी एमएमआरडीएच्या मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी ३५० ते ५०० सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट मिळवले. करारातील आकडय़ाऐवजी कंपनीने फक्त ७० टक्केच सुरक्षा रक्षक पुरवले. मात्र पगार आणि अन्य लाभांची रक्कम करारानुसार (३५० ते ५०० सुरक्षारक्षकांनुसार) वसूल केली. या गैरव्यवहारातून आणि एकूण करारातून कंपनीला होणाऱ्या नफ्यातील ५० टक्के रक्कम चांदोलेच्या माध्यमातून सरनाईक यांना दिली जात होती, असे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाल्याचे ईडीने गुरुवारी न्यायालयाला सांगितले. कंत्राटातील गैरव्यवहार किंवा एमएमआरडीएची फसवणूक करून मिळवलेला नफा हा भ्रष्टाचार आहे. या गुन्ह्यात आणि गुन्ह्य़ाच्या कटात सरनाईक सहभागी आहेत, असा दावाही ईडीने केला.

‘टॉप्स ग्रुप’ कंपनीचे माजी उपाध्यक्ष रमेश अय्यर यांनी नंदा, कुटुंबीय आणि अन्य व्यक्तींविरोधात दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार केली होती. या तक्रारीत नंदा यांनी देश, परदेशात केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत आरोप आहेत. एमएमआरडीएचे कंत्राट, त्यातील गैरव्यवहार आणि नफ्याचे वाटप हा त्यापैकी एक आरोप आहे.

दंडाधिकरी न्यायालयाने अय्यर यांच्या खासगी तक्रारीवर येलो गेट पोलिसांना फौजदारी दंड संहितेतील कलम १५६ (३)नुसार दखलपात्र गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या महिन्यात येलो गेट पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या गुन्ह्य़ाचा तपास करण्यासाठी ईडीनेही ३० ऑक्टोबरला ईसीआयआर (एन्फोर्समेन्ट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट) दाखल केला. अय्यर यांच्यासह संबंधीतांचे जबाबही नोंदवले.

आरोप काय?

* एमएमआरडीएच्या कंत्राटातून मिळणाऱ्या नफ्यातील वाटा सरनाईक यांच्यापर्यंत पोच करण्याची जबाबदारी कंपनीच्या माजी मुख्यकारी अधिकारी नीरज बिजलानीवर होती, अशी माहिती अय्यर यांनी दिली. त्यामुळे बिजलानीकडे चौकशी करण्यात आली.

* बिजलानीने चांदोलेकरवी सरनाईक यांना ५० टक्क्के  नफा पोच केल्याची बाब कबूल केली. तसेच या कामासाठी चांदोले आणि त्याचा साथीदार संकेत मोरे यांना दरमहा ५० हजार आणि प्रत्येक सुरक्षा रक्षकामागे ५०० रुपये दलाली म्हणून दिली जात होती, असेही सांगितले.

* अय्यर यांनी आपल्या जबाबात, या कंत्राटाच्या व्यवहारात २०१४ ते आतापर्यंत सुमारे सात कोटी रुपये चांदोले आणि मोरे यांना दिल्याचा दावा केला असून त्याबाबत तपास सुरू असल्याचेही ईडीने न्यायालयात स्पष्ट केले.

* चांदोलेने चौकशीदरम्यान एमएमआरडीएकडून कंत्राट मिळण्याआधीच कंपनीने (नंदा) सरनाईक यांचा ५० टक्के नफा निश्चित केला होता. ही बाब फक्त तोंडी होती. कागदोपत्री याचा उल्लेख कोठेही नाही. नंदा यांची भेट सरनाईक यांच्यामुळे घडली, अशी माहिती त्याने दिल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले.

पीटर केरकर अटकेत

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने गुरुवारी रात्री कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज कंपनीचे प्रमुख अजय अजित पीटर केरकर यांना अटक केली. विविध बँका, वित्तीय संस्थांना कर्जाच्या नावे ५,५०० कोटींचा गंडा घालण्यासह परदेशात कोटय़वधींच्या अर्थिक गैरव्यवहारांचे आरोप त्यांच्यावर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 12:17 am

Web Title: mmrda contract scam from tops group abn 97
Next Stories
1 ‘ईडी’ला तपासास विशेष न्यायालयाचा मज्जाव
2 परराज्यातील १३,२५३ प्रवाशांची तपासणी
3 रद्द केलेल्या सहलींच्या शुल्क परताव्याबाबत लवकरच दिलासा
Just Now!
X