मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आता मुंबई लगतच्या परिसरातील पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केले असून शीळ-महापे रस्ता व ठाणे-बेलापूर रस्त्यावरील उड्डाणपुलासह महापे येथील भुयारी मार्ग प्रकल्पाला सोमवारी प्राधिकरणाच्या कार्यकारिणी समितीत मान्यता देण्यात आली. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर पूर्व येथील छेडा नगर येथे उड्डाणपूल बांधण्याच्या प्रस्तावाची शिफारस प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.
शीळ-महापे रस्त्यावर एल अँड टी जंक्शन येथे चार पदरी उड्डाणपूल मंजूर झाला आहे. त्यासाठी १८० मीटर आणि २२० मीटर लांबीचे पोच मार्ग असतील. या प्रकल्पांतर्गत एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि सुमारे ६.५ किलोमीटर लांबीचे सेवा रस्तेही समाविष्ट आहेत. या प्रकल्पाची अंदाजे किंमत ४७ कोटी ५० लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे ठाणे-बेलापूर रस्त्यावर घणसोली नाका ते तळवली नाका येथे आणि सविता केमिकल्स जंक्शन येथे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव समितीने मंजूर केला. या प्रकल्पामध्ये महापे ते जंक्शन येथे वाहनांसाठी एक भुयारी मार्गही मंजूर करण्यात आला आहे. घणसोली नाका व तळवली नाका हा १.४ किलोमीटर लांबीचा प्रत्येकी दोन मार्गिकांच्या उड्डाणपुलासाठी १०८ कोटी ८१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सविता केमिकल नाका येथे ठाणे-बेलापूरच्या दिशेने दोन मार्गिकांचा ६०० मीटर लांबीचा उड्डाणपूल २६ कोटी ५४ लाख रुपये बांधून पूर्ण करण्यात येणार आहे. तर महापे येथे ठाणे ते बेलापूर ५०० मीटर लांबीचा तीन मार्गिकांचा भुयारी रस्ता (१९.६३ कोटी) बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत १५५ कोटी रुपये आहे.
तर छेडा नगर येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी २ उड्डाणपूल व एका उन्नत मार्गाचा समावेश असलेला प्रकल्प सुचवण्यात आला आहे. पूर्व मुक्त मार्ग व सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता येथून वाहने सुसाट येतात. मात्र छेडा नगर येथे वाहतुकीची कोंडी होऊन बसते. हीच कोंडी सोडवण्यासाठी या प्रकल्पाची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार शीव येथे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन मार्गिकांच्या उड्डाणपुलास समांतर असा तीन मार्गिकांचा ६८० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येईल. त्यासाठी अंदाजे ५७ कोटी ६६ लाख रुपये खर्च येईल. नवी मुंबईकडून येणारी वाहने ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी दोन मार्गिकांचा व १२४० मीटर लांबीचा उड्डाणपूलही बांधण्यात येईल. त्यासाठी ९४ कोटी ३९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच छेडा नगर उड्डाणपूल व अमर महल जंक्शन उड्डाणपूल यांना जोडणारा ६५० मीटर लांबीचा व दोन मार्गिकांचा उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ५२ कोटी २८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
त्याचबरोबर ठाणे-भिवंडी-कल्याण या भागातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक प्रकल्पांचा तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठीही समितीने मंजुरी दिली. तसेच नवघर ते चिरनेर या बहुद्देशीय मार्गासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
हा प्रकल्प भिवंडी, डोंबिवली, कल्याण, पनवेलसाठीही उपयुक्त ठरणार आहे.

मंजुरी मिळालेले मार्ग
* शीळ-महापे रस्ता व ठाणे-बेलापूर रस्त्यावरील उड्डाणपुल
* महापे येथील भुयारी मार्ग

या मार्गाच्या शिफारसी
* पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर पूर्व येथील छेडा नगर येथे उड्डाणपूल
* छेडा नगर उड्डाणपूल व अमर महल जंक्शन उड्डाणपूल यांना जोडणारा ६५० मीटर लांबीचा व दोन मार्गिकांचा उन्नत मार्ग
* ठाणे-भिवंडी-कल्याण या भागातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक प्रकल्पांचा तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अहवाल