21 January 2019

News Flash

वडाळा-कासारवडवली मेट्रोचा गायमुखपर्यंत विस्तार

मेट्रो-४ म्हणून ओळखला जाणाऱ्या या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी ३२.३ कि.मी. आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

९४९ कोटी रुपयांच्या विस्तारित मार्गाला मान्यता

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या वडाळा ते कासारवडवली या मार्गाचा गायमुखपर्यंत विस्तार करण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत शुक्रवारी मान्यता देण्यात आली. मेट्रो-४ अ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विस्तारित मार्गासाठी ९४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्य़ाद्री अतिथीगृहावर मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) १४४वी बैठक पार पडली. त्यात विविध विकास प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आले. वडाळा ते ठाणे-कासारवडवली या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. मेट्रो-४ म्हणून ओळखला जाणाऱ्या या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी ३२.३ कि.मी. आहे. त्याचा गायमुखपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. हे २.७ कि.मी. अधिकचे अंतर असेल. त्यावर आणखी दोन नवीन स्थानके बांधण्यात येणार आहेत. या मार्गावर २०२१ मध्ये दीड लाख प्रवासी क्षमता असेल आणि २०३१ मध्ये ही क्षमता १३.४४ लाख एवढी असेल. या विस्तारित मार्गासाठी ९४९ कोटी रुपये अतिरिक्त खर्च केला जाणार आहे.  या वेळी मेट्रो मार्ग २ ब च्या मंडाळे येथील डेपोच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली.

वडाळय़ात व्यावसायिक संकुल

वडाळ्यात बीकेसीसारखे व्यावसायिक संकुल वडाळ्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वांद्रे-कुर्ला संकुलासारखे व्यावसायिक-निवासी संकुल उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहतूक सेवा पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बस टर्मिनलही उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर वर्सोवा ते विरापर्यंतचा पट्टा सागरी सेतूने जोडण्याबाबत अभ्यास अहवाल सादर करण्यासही सांगितल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

First Published on January 13, 2018 4:42 am

Web Title: mmrda extend metro iv route from wadala to gaimukh