अक्षय मांडवकर

उत्पन्न थेट प्राधिकरणाच्या तिजोरीत जमा होणार

मुंबईतील मेट्रो मार्गिकांचे संचलन आणि देखरेखीची (ऑपरेशन अ‍ॅण्ड मेन्टेनन्स-ओएनएम) जबाबदारी खासगी कंपनीला देण्याऐवजी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए) प्रशासन स्वत:च सांभाळणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ‘ओएनएम’ विभागाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे मेट्रो प्रकल्पांतून मिळणारे उत्पन्न थेट प्राधिकरणाच्या तिजोरीत जमा होईल.

सध्या शहरात कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो ३), दहिसर (पू.) ते डी. एन. नगर (मेट्रो २ ए) आणि दहिसर (पू.) ते अंधेरी (पू.) ( मेट्रो ७) या मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. यामधील मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर असून बांधकाम संरचनेमधील ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. शिवाय डी. एन. नगर ते मंडाले (मेट्रो २ बी) आणि वडाळा-घाटकोपर-कासारवडवळी (मेट्रो ४) या मेट्रो मार्गिकांच्या निर्मितीसाठी मार्गरोधक लावण्यात आले आहेत. दोन मेट्रो मार्गिकांची बांधकाम संरचना पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने महिनाअखेपर्यंत मेट्रो डब्यांच्या निर्मितीचे कंत्राट देणार असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’मधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र येत्या काळात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणाऱ्या मेट्रो मार्गिकांचे संचलन आणि देखरेखीच्या (ओएनएम) व्यवस्थापनाचे काम यापुढे स्वत: करणाचा निर्णय ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने घेतला आहे.

सध्या सुरू असलेल्या वर्सोवा-घाटकोपर (मेट्रो १) मेट्रोच्या ‘ओएनएम’ची जबाबदारी ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ (रिलायन्स) कंपनीकडे सोपविली आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न कंपनीच्या तिजोरीत जमा होत आहे. मेट्रो प्रकल्पांच्या निर्मितीसाठी राज्य व केंद्र सरकारसह परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठय़ा प्रमाणात कर्ज घेण्यात आले आहे.

‘ओएनएम’ची जबाबदारी एखाद्या कंपनीला दिल्यानंतर त्याद्वारे निर्माण होणारे उत्पन्न खासगी कंपनीच्या तिजोरीत जमा होते. मात्र कर्ज फेडण्याचे काम प्राधिकरणालाच करावे लागत असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली. त्यामुळे मेट्रो प्रकल्पांच्या माध्यमातून निर्माण होणारे उत्पन्न थेट प्राधिकरणाकडे येण्याच्या उद्देशाने मेट्रो प्रकल्पाच्या ‘ओएनएम’चे काम ‘एमएमआरडीए’ स्वत: पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशातील मेट्रोच्या ‘ओएनएम’चा अभ्यास करण्यासाठी दोन पथके सिंगापूर आणि हाँगकाँगला रवाना होणार असल्याचे आर. ए. राजीव यांनी सांगितले.

पुढील वर्षांत सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गिकांचे संचलन आणि देखरेख (ओएनएम) करण्यासाठी एमएमआरडीए प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी ओएनएम विभागाची निर्मिती केली जाणार आहे. साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान स्थापना करण्याच्या प्रयत्नात आहोत.

– आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए