उड्डाणपुलाच्या कामातील अडथळा दूर
मुंबईतील पहिलावहिला स्कायवॉक पाडण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले असून शनिवारी रात्री या स्कायवॉकची दक्षिण मार्गिका पाडण्यात आली. वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेला हा स्कायवॉक वांद्रे-वरळी सी लिंक ते वांद्रे-कुर्ला संकुल यांना जोडणाऱ्या नियोजित उड्डाणपुलाच्या आड येत असल्यामुळे पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
शनिवारी रात्री ११ ते रविवार सकाळी ५ या वेळेत स्कायवॉकची दक्षिण मार्गिका पाडण्याचे काम करण्यात आले. तर, उत्तर मार्गिका रविवारी रात्री याच वेळेत पाडण्याचे नियोजन होते. या स्कायवॉकचा वांद्रे पूर्व येथील म्हाडा, कलानगर, वांद्रे-कुर्ला संकुल येथे जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वापर होत असे. स्कायवॉकचा पर्याय बंद झाल्यामुळे पादचाऱ्यांना पश्चिम द्रुतगती मार्ग ओलांडताना मोठय़ा वाहतूकीला तोंड द्यावे लागणार आहे. नियोजित उड्डाणपुलाचे ७१४ मीटरचे बांधकाम सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल, असे एमएमआरडीएने सांगितले. त्यानंतर स्कायवॉकच्या दोन्ही मार्गिका पुन्हा नव्याने बांधण्याचे काम प्राधिकरणाकडून हाती घेण्यात येईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2019 12:58 am