‘मुंबई महानगर’च्या रिंगरूटमधील प्रस्तावित प्रकल्पांबाबत तीन महिन्यांत निर्णय

सुहास जोशी, लोकसत्ता

मुंबई : मुंबई आणि तिच्या आसपास वेगाने विस्तारत चाललेल्या शहरांना कवेत घेण्यासाठी होऊ घातलेल्या सिग्नलविरहित ‘रिंगरूट’मधील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचा मार्ग येत्या तीन महिन्यांत निश्चित होण्याची शक्यता आहे. वसई ते मीरा भाईंदर आणि मीरा-भाईंदर ते वर्सोवा सागरी सेतू हे दोन प्रकल्प मार्गी लागल्यास अलिबाग- नवी मुंबई- विरार- वसई- वसरेवा- वरळी- शिवडी- नवी मुंबई यांना एकमेकांशी जोडणाऱ्या वेगवेगळय़ा प्रकल्पांना आणखी बळ मिळणार आहे.

मुंबई आणि महानगर प्रदेशात सध्या सुरू असलेले विविध वाहतूक प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुढील दहा वर्षांत सिग्नलविरहित रिंगरुट अस्तित्वात येऊ शकतो अशी शक्यता ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी गेल्या आठवडय़ात व्यक्त केली होती. मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (एमटीएचएल) पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी ही शक्यता मांडली. मात्र या अपेक्षित रिंगरुटमधील वसई ते मीरा भाईंदर खाडी पूल आणि मीरा भाईंदर ते वर्सोवा सागरी सेतू हे दोन प्रकल्प अद्याप सुरूच झालेले नाहीत. यापैकी मीरा भाईंदर ते वर्सोवा या सागरी सेतूबाबत सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. ते काम पुढील एक ते दोन महिन्यांत पूर्ण होईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर वसई ते मीरा भाईंदर या उन्नत मार्ग व खाडी पुलासाठी वन विभाग आणि मिठागर आयुक्तालय यांच्या परवानग्या आधीच घेण्यात येत आहेत. या परवानग्या लवकरच मिळण्याची शक्यता असून पाठोपाठ सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांची निविदा प्रक्रिया तीन महिन्यांनंतर निघण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी  व्यक्त केली.

या सर्व प्रकल्पांमुळे दहा वर्षांत रिंगरुट प्रत्यक्षात येऊ शकेल. नुकतेच काम करू झालेला वरळी-शिवडी उन्नत मार्ग, एमटीएचएल, विरार अलिबाग मल्टी मोडल कॉरिडॉर, प्रस्तावित वसई-मीरा भाईंदर उन्नत मार्ग, प्रस्तावित वर्सोवा-मीरा भाईंदर सागरी सेतू, सध्या काम सुरू असलेला वांद्रे-वर्सोवा सेतू, वांद्रे-वरळी सागरी असा सिग्नलविरहित रिंगरुट तयार होऊ शकतो. तसेच सागरी किनारा मार्ग हा दक्षिण मुंबईपर्यंत असून, दक्षिण मुंबईतून घाटकोपपर्यंत जाणारा पूर्व मुक्तमार्गाची एमटीएचलशी जोडणी होणार आहे.

‘केवळ वाहनांची सोय’

अशा प्रकल्पांमध्ये सर्व मार्गावर सार्वजनिक बस वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका किंवा व्यवस्था याचा विचार यात होत नसल्याकडे वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी लक्ष वेधले. अशा विविध मार्गामध्ये केवळ खासगी चारचाकी वाहनांचाच (कार) विचार अधिक होतो, परिणामी शहरांमध्ये चारचाकी वाहनांची गर्दी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. खासगी चारचाकी वाहनकेंद्रित वाहतूक नियोजन हे योग्य नसल्याचे ते म्हणाले. किंबहुना उन्नत मार्ग, सागरी सेतू यामध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टील आणि काँक्रीटमुळे होणारी पर्यावरणाची हानी कशी भरून काढणार यावर भर द्यावा लागेल, असे ते म्हणाले.